Chandrapur News: सहावा वेतन लागू… पण 19 वर्षांपासून थकबाकीच नाही! मलेरिया फवारणी कामगारांचा आक्रोश
जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयांतर्गत हंगामी मलेरिया प्रतिबंधक कामगार काम करतात. पूर्वी राज्यात या कामगारांची संख्या १० हजारांच्या आसपास होती. जिल्ह्यात सहाशेवर कामगार होते. पूर्वी बाराही महिने या कामगारांना फवारणीचे काम मिळायचे. त्याची मजुरीही त्यांना चांगली मिळायची. राज्य शासनाने २००६ मध्ये सहावा वेतन आयोग लागू केला. अन्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे मलेरिया प्रतिबंधक फवारणी कामगारांनाही तो लागू करण्यात आला. (फोटो सौजन्य – Instagram)
सहावा वेतन आयोग लागू झाल्याने केलेल्या कामाचे चीज झाल्याची भावना या कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण झाली. मात्र, त्यांच्या भावनांचा अपेक्षाभंग झाला. या कर्मचाऱ्यांना २००६ मध्ये सहावा वेतन आयोग लागू झाला असला तरी त्याची अंमलबजावणी पाच वर्षांनी करण्यात आली. सहावा वेतन आयोग लागू करण्यात आल्यानंतर त्याची ५ वर्षांची थकबाकी मिळणे अभिप्रेत होते. मात्र, गत १९ वर्षांपासून मलेरिया प्रतिबंधक फवारणी कामगारांना थकबाकी मिळाली नाही. थकबाकीचा आकडा ४ कोटी ५ लाख ५९ हजार इतका आहे. थकबाकी देण्याबाबत अर्थमंत्री, आरोग्यमंत्र्यांना कित्येकदा निवेदन देण्यात आले. पत्रव्यवहार करण्यात आला. मात्र, त्याची आजवर दखल घेण्यात आली नाही. सहावा वेतन आयोग लागू करून राज्य शासनाला थकबाकीचा विसर पडला. थकबाकीसाठी या हंगामी फवारणी कामगारांचा लढा अजूनही सुरूच आहे.
राज्य शासनाने हंगामी फवारणी प्रतिबंधक कामगारांना सहावा वेतन आयोग लागू केला. मात्र, त्याची अंमलबजावणी ५ वर्षांनी करण्यात आली. दरम्यानच्या काळातील त्याची थकबाकी अजूनही देण्यात आली नाही. राज्य शासनाने या कामगारांची फसवणूक केली आहे. – प्रा. रमेशचंद्र दहीवडे, अध्यक्ष, मलेरिया फवारणी कामगार संघटना
८८ जिल्हातील १२२ गावांत फवारणीचे काम सुरू आहे. वर्षभरातून २ फवारणीचे काम चालते. या कामगारांना बोलावूनही ते येत नाही. – डॉ. प्रकाश साठे, जिल्हा हिवताप अधिकारी, चंद्रपूर
गत काही वर्षांत कल्याणकारी योजनांवरील निधीला कात्री लावण्यात येत आहे. मलेरियांच्या रुग्णांत घट झाल्याचा दावा करून हिवताप विभागाने आता मोजक्याच ठिकाणी फवारणीचे सुरू ठेवले आहे. जिल्ह्यात १२२ गावांतच सध्या फवारणीचे काम सुरू असल्याची माहिती जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयाने दिली. फवारणी करणारे कामगारही कमी असल्याचे या विभागाकडून सांगण्यात आले. पूर्वी पावसाळ्यातील ४ महिने फवारणीचे काम चालायचे. त्यानंतर हेच काम २ महिन्यांवर आले. त्यानंतर एक महिना आणि आता १५ दिवसच फवारणीचे काम करण्यात येत आहे.






