संग्रहित फोटो
कराड : महायुती बळकट आहे. पक्षवाढीसाठी कार्यकर्त्यांना काही भूमिका मांडाव्या लागतात. आम्ही दीड कोटी सदस्यसंख्या असलेला भाजप गठीत करत आहोत. एकनाथ शिंदे, आणि अजित पवारही त्यांच्या पातळीवर पक्षवाढ करत आहेत. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आम्ही महायुती म्हणूनच लढवणार असून, राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांवर महायुतीचा कब्जा असेल, असा विश्वास राज्याचे महसूल मंत्री, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.
कराडमध्ये प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते. एकनाथ शिंदेंनी पुण्यात भगवा फडकवण्याचा दावा केला असून, अजित पवार यांनी आम्हीच तिरंगा फडकवणार असल्याचे म्हटल्याच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी आपली भूमिका मांडली. बावनकुळे म्हणाले, महायुतीतील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी ज्या- ज्या ठिकाणी लढतील, तिथे युतीतील इतर पक्ष मदत करतील. त्यामुळे महायुतीमध्ये कोणतेही वितृष्ट नसल्याचा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला.
फडणवीस शिंदेचे घोटाळे बाहेर काढत असतील, तर त्यांचे स्वागत आहे? या संजय राऊत यांच्या वक्तव्यावर मंत्री बावनकुळे म्हणाले, एकनाथ शिंदे यांनी कोणताही घोटाळा केलेला नाही. आमचे सरकार पारदर्शी व गतिमान आहे. संजय राऊत यांनी पाच वर्षे विरोधी पक्षात चांगले काम करावे, सरकारला चांगल्या भूमिका सांगाव्यात. महायुती भक्कम आहे. त्यामुळे राऊत यांनी असे कितीही खडे टाकले, तरी त्याचा काही परिणाम होणार नाही. महाराष्ट्रातील जनता आणि भाजप त्यांचे काही ऐकत नाही, असे सांगून पुढील पंधरा वर्षे महाराष्ट्रात महायुतीचे सरकार असेल; ते हलणार नाही, असा विश्वास मंत्री बावनकुळे यांनी व्यक्त केला.
शाडो कॅबिनेट उपयोग होणार नाही
शरद पवार यांनी शाडो कॅबिनेट तयार केले असल्याच्या प्रश्नावर ते म्हणाले, शाडो कॅबिनेटचा अभ्यास पहिल्यांदा उद्धव ठाकरे सरकारला करावा लागेल. ठाकरे सरकारच्या काळात जे कॅबिनेट होते, त्यावर शाडो कॅबिनेट चांगले काम करेल, असा टोला लगावत आमचे सरकार एवढे पारदर्शक आहे की, कितीही शाडो कॅबिनेट तयार केले; तरी त्याचा काही उपयोग होणार नाही, असा निर्वाळाही मंत्री बावनकुळे यांनी यावेळी केला आहे.
कोरटकरांना पाेलिस जेरबंद करतील
इतिहासकार इंद्रजीत सावंत यांना धमकी दिलेले प्रशांत कोरटकर चार दिवसांपासून फरार आहेत. त्यांना फरार करणारा आका कोण आहे? या प्रश्नावर मंत्री बावनकुळे म्हणाले, आका वगैरे कोणी लागत नाही. पोलिस त्यांना कोणत्याही परिस्थितीत शोधून जेरबंद करतील. पोलिसांवर कसलाही दबाव नाही. त्यामुळे आरोपीला पकडून त्याच्यावर योग्य कारवाई होईल.