ठाणे- छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक होते म्हणजेच ते धर्मवीरही होते, मात्र ते एकट्या कुठल्या धर्मासाठी नव्हते, अशी सारवासारव राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. स्वराज्याचं रक्षण मरेपर्यंत संभाजीराजेंनी केलं, म्हणून त्यांना स्वराज्य रक्षक म्हणणं बरोबरच आहे. मात्र त्यांना एका कुठल्याही एका धर्माशी जोडणं अयोग्य असल्याचं आणि असा कुठलाही ऐतिहासिक उल्लेख नसल्याचं आव्हाड म्हणालेत. असा उल्लेख असता तर संभाजीराजेंना स्वातंत्र्यवीर सावरकर आणि रा. स्व. संघाचे सरसंघचालक गोळवलकर यांनी स्त्रीलंपट आणि दारुड्या असं म्हणण्याचं कारण नव्हतं, असंही आव्हाड म्हणालेत. हा दाखला इतिहासात त्यांच्या पुस्तकात आहे. आपल्या अंगावर आलं की दुसऱ्यावर ढकलून द्यायचं हे काम सुरु असल्याचंही आव्हाड म्हणाले. संभाजीराजेंना क्रूरपणे मारण्यात आलं. मात्र कोणत्या धर्मासाठी किंवा धर्माच्या प्रचारासाठी मृत्यू पत्करला हे अमान्य असल्याचं आव्हाड म्हणाले. जर संभाजीराजे इतके महान होते तर त्यांच्याबाबत सावरकर आणि गोळवलकरांनी असं का लिहिलं, याचं उत्तर त्यांना खांद्यावर घेऊन फिरणाऱ्या भाजपाच्या नेत्यांनी द्यावं, असं आव्हानही त्यांनी दिलंय. या प्रश्नांचं उत्तर दिलं तर त्यांनी आम्हाला प्रश्न विचारावेत, असंही आव्हाड म्हणालेत.
संभाजीराजे स्वराज्यरक्षक म्हणजेच धर्मवीर-आव्हाड
छत्रपती संभाजीराजे हे स्वराज्यरक्षक होते म्हणजेच ते धर्मवीर होते. स्वराज्यात धर्म असतो, त्या धर्माचं रक्षण करण्यासाठी शंभूराजे आणि छत्रपती शिवाजी महाराज लढले, झगडले. असंही आव्हाड म्हणालेत. ते ताठ मनाने औरंगजेबाला सामोरे गेल्याचंही आव्हाड म्हणाले. महाराष्ट्रानं त्या वेळी मराठा धर्म पाळला. संभाजीराजे स्वराज्यरक्षक आणि धर्मवीर होते , मात्र ते एका कुण्या धर्मासाठी होते, असं नाही, असं आव्हाड म्हणालेत.
औरंगजेब क्रूर होता, आव्हाडांचं घूमजाव
आरंगजेब क्रूर आणि हिंदूद्वेषा नव्हता, असं वक्तव्य काल आव्हाडांनी केलं होतं. त्यावर आज त्यांनी घूमजाव केलंय. औरंगजेब हा प्रचंड क्रूर होता. त्याने काकाला, भावाला त्यानं मारलं. बापाला तुरुंगात टाकलं. पण त्याच्यासमोर महाराष्ट्र, शिवाजी महाराज, संभाजी महाराज झुकले नाहीत. असंही आव्हाड म्हणाले. माध्यमांनी सोमवारी वक्तव्याचा विपर्यास केला असंही आव्हाड म्हणाले. आपण आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचंही त्यांनी सांगितलंय.