संभाजीनगरमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात (Photo Credit - X)
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमध्ये महापालिका निवडणूक प्रभाग आरक्षण मंगळवारी ११ रोजी जाहीर झाले. अनेकांना यात पुन्हा संधी मिळाली तर अनेकांचे स्वप्न भंगले. स्वप्न भंगलेले इच्छुक उमेदवार दुसरीकडे चाचपणी सुरु झाली आहे तर आपली आई, पत्नीला उभे करून सत्ता काबीज करण्याचाही प्रयत्न सुरु झाला आहे. महापालिकेच्या स्थापनेनंतर प्रथमच प्रभाग रचनेनुसार निवडणुका होत आहेत. (Maharashtra Local Body Election)
सोशल मीडियातून प्रचारही सुरु
मंगळवारी महापालिका प्रशासनाकडून ११५ वाडाँची २९ प्रभागांमध्ये वाटणी करून ड्रॉ काढण्यात आले. आरक्षण जाहीर झाल्यानंतर आता इच्छुक कामाला लागले आहेत. आरक्षित प्रभाग आपल्याला ‘सूट’ होतो का ? याकडे इच्छुक डोळे लावून होते. ज्यांना वार्ड सुटले ते कामाला लागले आहेत तर ज्यांची संधी हुकली आहे त्यांनी आपल्या पत्नीला, आईला मैदानात उतरवण्याचा निर्णय घेत सोशल मीडियातून प्रचारही सुरु केला आहे.
शहरातील राजकीय चित्र
शरहातील एकदंरीत राजकीय चित्र पाहता या निवडणुकीत भाजप, शिंदे सेनेसह एमआयएमला फायदा होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे काँग्रेससह, शिवसेना (उबाठा), रा. कॉ. (शप) पक्षांना मोठी कसरत करावी लागण्याची शक्यता आहे. राजकीय वर्तुळात सुरु असलेल्या चर्चेनुसार, प्रभागरचनेनुसार होणाऱ्या निवडणुकांमुळे सत्ताधारी महायुतीला अधिक फायदा मिळू शकेल. यात भाजप आणि शिंदेसेचे पारडे जड राहील. यासोबतच यंदा एमआयएमदेखील फायद्यात राहू शकतो.
महायुतीची ताकद अधिक; उबाठा करावी लागेल कसरत
शहरात महायुतीकडे अधिक ताकद दिसून येते. शहरातील तिनही विधानसभा मतदारसंघात महायुतीचा दबदबा आहे. दुसरीकडे उबाठा गटाला ही निवडणूक आव्हान म्हणून पहावी लागणार आहे. लोकसभेत जरी चांगली कामगिरी केली असली तरी विधानसभा निवडणुकीत उबाठाचे काम समाधानकारक नव्हते. संभाजीनगर हे शिवसेनेचे गड राहिले आहे. येथे कट्टर शिवसैनिक आहे. मात्र शिवसेनेत फाटाफूट झाल्यानंतर मतदारही विभागले आहेत. शिंदेसेनेकडे अधिक आमदार असल्याने त्यातही पालकमंत्रीही त्यांचा आहे. याशिवाय भाजपची भक्कम साथही त्यांना मिळणार असल्याने शिंदेसेनेची ताकद वाढलेली आहे. त्यांना टक्कर देण्यासाठी उबाठा गटाला मोठी कसरत करावी लागणार आहे.
काँग्रेस, रा. कॉ.ला एमआयएमचे आव्हान
महापालिकेवर आपलाच महापौर येईल असा काँग्रेसचा दावा आहे. मात्र शहरात काँग्रेस आणि रा. कॉ.ची ताकद मविआतील अन्य घटकपक्षाच्या तुलनेत कमी आहे. आधी मुस्लिम मतदार काँग्रेस आणि रा. काँ, चा हक्काचा मतदार होता मात्र १५ वर्षांपूर्वी एमआयएम आल्यानंतर काँग्रेस आणि रा. कॉ. ची शक्ती कमी झाली आहे.
इच्छुक मतदारांच्या दारी
महापालिका कार्यकाळ संपून पाच वर्षे होत आहेत. त्यामुळे आता इच्छुक महापालिकेत बसण्यास आतुर झाले आहेत. आरक्षण जाहीर होताच आता इच्छुक कामाला लागले आहेत. मतदारांमध्ये मिसळून नमस्कार घातले जात आहेत. त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या जात आहेत. समस्या सोडविण्याचे आश्वासही दिले जात आहे. सोहळा मीडियावर तर प्रचाराला महापूर आला आहे.






