२७४० कोटींच्या नव्या जलवाहिनीलाही तडा
वर्षानुवर्षे रखडलेला आणि उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली पूर्णत्वाकडे गेलेला हा प्रकल्प ‘आता काही दिवसांत पाणी नळात’ या आश्वासनांसह पुढे आणला जात होता. मात्र, प्रत्यक्ष चाचणीतच मुख्य पाइपलाइनने दगा दिल्याने संपूर्ण यंत्रणेला धक्का बसला आहे. नवीन योजनेच्या पहिल्या टप्प्यात २०० एमएलडी पाणीपुरवठ्यासाठी जॅकवेलमधून मुख्य पाइपलाइनमध्ये पाणी सोडून प्रत्यक्ष चाचणी सुरू करण्यात आली होती. २३ मार्च रोजी रात्री पंप सुरू करून सुरुवातीला सुमारे ९०० मीटर अंतरापर्यंत पाणी नेण्यात आले. त्यानंतर पुढील दिवशी साडेतीन किलोमीटरपर्यंत जलवाहिनीची चाचणी यशस्वी झाली.
तिसऱ्या दिवशी दहा किलोमीटरपर्यंत पाणी पोहोचले आणि मधल्या टप्प्यांमध्ये आढळलेल्या किरकोळ गळती दुरुस्त करण्यात आल्या. चौथ्या दिवशी कारकीनपर्यंत सुमारे १३.८० किलोमीटर अंतर पार केल्यानंतर मात्र मुख्य पाइपलाइनच्या वेल्डिंगमध्ये बिघाड झाल्याचे लक्षात आले. पाइपलाइनमध्ये पाणी भरलेले असल्याने तात्काळ काम करणे शक्य नव्हते. त्यामुळे संपूर्ण लाईन रिकामी करूनच दुरुस्तीची प्रक्रिया सुरू करावी लागली.
शहरासाठी सुमारे २७४० कोटी रुपये खर्चुन उभारण्यात येत असलेली ही महत्वाकांक्षी योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत जीव्हीपीआर कंत्राटदार कंपनीकडून राबवली जात आहे. योजना अंतिम टप्प्यात असताना अशा प्रकारचा बिघाड उघड झाल्याने संपूर्ण प्रकल्पाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. पुढील ५० वर्षांसाठी ही योजना महत्त्वाची मानली जात असल्याने सुरुवातीलाच अशा त्रुटी समोर येणे चिंताजनक मानले जात आहे.
या योजनेअंतर्गत जॅकवेलचे काम पूर्ण झाले असून त्यावर ३७०० अश्वशक्तीचे दोन उच्च क्षमतेचे पंप बसविण्यात आले आहेत. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर जायकवाडी धरणातून सायफन पद्धतीने जॅकवेलमध्ये पाणी घेण्यात आले. दोन दिवस साठवलेल्या पाण्याची तपासणी करून त्यानंतर मुख्य पाइपलाइनमध्ये सोडण्यात आले. ही प्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर प्रत्यक्ष पुरवठ्याकडे वाटचाल सुरू झाली होती; मात्र त्याच वेळी हा बिघाड समोर आला.
मुख्य पाईपलाईनची पारंपरिक हायड्रॉलिक चाचणी करण्याऐवजी अल्ट्रासाऊंड तंत्राचा वापर करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे प्रत्यक्ष दबावाखाली पाइपलाइनची ताकद कितपत तपासली गेली, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. काही ठिकाणी पाइपलाइनवर सिमेंटचा थर देण्यात आल्यामुळे दोष लपले गेले असावेत, अशीही शक्यता व्यक्त होत आहे. आता संबंधित भागातील सिमेट काढून नव्याने वेल्डिंग केले जात आहे.
सध्या दुरुस्तीचे काम सुरू असून संबंधित यंत्रणांनी अधिक दक्षता घेण्याची गरज व्यक्त होत आहे. भविष्यातील मोठ्या पाणीपुरवठ्यावर या योजनेचा थेट परिणाम होणार असल्याने प्रत्येक टप्प्यावर गुणवत्ता नियंत्रण आणि पारदर्शकता राखणे अत्यावश्यक आहे. शहरवासीयांच्या अपेक्षा लक्षात घेता ही चाचणी निर्णायक ठरणार आहे.
गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर योजना सुरू करण्यासाठी घाई करण्यात आल्याची चर्चा आहे. उद्घाटनाची घाई आणि वेळेचा दबाव यामुळे तांत्रिक तपासणीत काही बाबी दुर्लक्षित राहिल्या का, असा सवाल उपस्थित केला जात आहे, अशा त्रुटी समोर येणे प्रशासनासाठी धोक्याची घंटा मानली जात आहे.
कारकीनपर्यंत पाणी पोहोचले असले तरी पुढील चाचणी पूर्णपणे थांबली आहे. दुरुस्ती पूर्ण होईपर्यंत पाणी पुन्हा पाईपलाईनमध्ये सोडता येणार नाही. दोन दिवस चाचणी होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. रविवारी दुपारपर्यंत दुरुस्ती पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू असला तरी पुन्हा पूर्ण चाचणी करावी लागणार आहे.






