फोटो - सोशल मीडिया
मुंबई : बदलापूर अत्याचार प्रकरणावरुन राज्याचे वातावरण तापले आहे. चिमुकल्या मुलींवर शाळेतील शिपाईने केलेल्या अत्याचारामुळे नागरिक रोष व्यक्त करत आहे. या संदर्भात बदलापूरमध्ये सध्या तणावपूर्ण शांतात असून बदलापूरमधील इंटरनेट सेवा खंडित करण्यात आली आहे. त्याचबरोबर सर्व शाळांना देखील सुट्ट्या जाहीर करण्यात आली आहे. काल बदलापूरमध्ये अतिशय तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. या प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी आंदोलकांनी केली. बदलापूरच्या रेल्वे रुळावर तब्बल 12 तास आंदोलक होते. अनेकदा समजवण्याचा प्रयत्न केल्यानंतर आंदोलक माघार घेत नसल्यामुळे पोलिसांनी लाठीचार्ज देखील केला. या प्रकरणावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
भविष्यात असे प्रकार घडू नयेत म्हणून
बदलापूरच्या घटनेवरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरले आहे. बदलापूर प्रकरणावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “बदलापूरमधील घटना अतिशय दुर्दैवी आहे. आरोपींनी कठोर शिक्षा देण्यासाठी कारवाई करावी असे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत. ही केस फास्ट ट्रॅकवर घेण्यात येईल, त्यासाठी एसआयटी नेमण्यात आली आहे. ज्या पोलिसांनी दिरंगाई केली त्यांना निलंबित करण्यात आलं आहे. या परिवाराच्या मागे शासन असून सर्व सहकार्य करण्यात येईल. भविष्यात असे प्रकार घडू नयेत म्हणून पाऊलं उचलण्यात आली आहेत,” असे मत एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.
लाडकी बहीण योजनेचा पोटशूळ विरोधकांना उठला
बदलापूर प्रकरणावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनामाच्या मागणी केली आहे. यावरुन विरोधकांना उत्तर देताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, “यामध्ये लहान बच्चू आहेत. त्यामुळे यावरुन राजकारण करु नये. कालच्या आंदोलनामुळे दुर्दैवाने लाखो रेल्वे प्रवाशांना त्रास झाला. हे व्हायला नको होतं. परंतु कालचं आंदोलन हे राजकीय प्रेरित होतं. इतक्या जलदगतीने गाड्या भरून बाहेरून लोक आले. आंदोलकांना मंत्र्यांनी समजावलं, सगळ्या मागण्या मान्य केल्या. तरीही ते माघार घेत नव्हते. त्यांना सरकारला बदनाम करायचं होतं. राजकारण करायला अनेक मुद्दे आहेत. लहान मुलीचे राजकारण करणाऱ्याला लाज वाटली पाहिजे. राज्य सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेचा पोटशूळ विरोधकांना उठला आहे. विरोधकांना सांगणं आहे की यावरून राजकारण करू नका. लाडकी बहीण योजना त्यांच्या जिव्हारी लागली असल्याचं हे कालच्या आंदोलनातून स्पष्ट झालंय,” अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.