मुंबई – अनेक आव्हाने आली आपण ती पार केली, न्यायदेवतेचा आज निकाल आला. त्यांचा निकाल मान्य करायलाच हवा. त्यांनी सुद्धा तातडीने फ्लोअर टेस्ट करण्याचा राज्यपालाचे आदेशाचे पालन करण्याचे सांगितले. राज्यपालाने लोकशाहीचा मान राखला. तातडीने चोवीस तासांच्या आत फ्लोअर टेस्ट करायला लावली. पण दिड पाऊने दोन वर्षे बारा आमदारांची यादी लटकवून ठेवली अशा भावना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केल्या. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्रीपदाचा आणि विधान परिषदेची आमदारकीचा राजीनामा दिला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने फ्लोअर टेस्ट करण्याचा राज्यपालांचा निर्णयाचे पालन करण्याचे निर्देश महाविकास आघाडीला दिले. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबूक लाईव्हद्वारे जनतेशी रात्री साडे नऊ वाजता संवाद साधला.
आज न्यायदेवतेनं निकाल दिला आहे. तो मान्य असायलाच पाहिजे. उद्या तातडीने बहुमत चाचणी करण्याचा राज्यपालांनी आदेश दिला आहे, त्या आदेशाचं पालन करण्याचा निर्णय न्यायालयानं दिला आहे. राज्यपालांनाही धन्यवाद द्यायचं आहे की आपण लोकशाहीचा मान राखलात. काहींनी तुमच्याकडे पत्र दिल्यानंतर २४ तासांच्या आत बहुमत चाचणी करण्याचे आदेश दिले. पण दीड वर्षापासून विधानपरिषदेच्या १२ सदस्यांची यादी तुमच्याकडे प्रलंबित आहे, तीही तातडीने अजूनही मंजूर केलीत, तर आपल्याबद्दलचा आदर द्विगुणित होईल.
मी शिवसेना अनुभवत आलो आहे. रिक्षावाले, टपरीवाले, हातभट्टीवाले यांना शिवसेना प्रमुखांनी चांगल्या मार्गावर आणलं. माणसं मोठी झाली आणि मोठी झाल्यानंतर ज्यांनी आपल्याला मोठं केलं, त्यांनाच विसरायला लागली. ज्यांना आजपर्यंत मोठं केलं, सत्ता आपल्याकडे आल्यानंतर जे देता येणं शक्य होतं ते सगळं दिलं, ती लोकं नाराज झालो म्हणायला लागली. मातोश्रीला सातत्याने लोक येत आहेत. साधी माणसं येत आहेत. काळजी करू नका म्हणत आहेत. ज्यांना दिलं ते नाराज, ज्यांना नाही दिलं, ते हिंमतीनं सोबत आहेत. याला म्हणतात माणुसकी. याच नात्याच्या जोरावर शिवसेना आजपर्यंत मजबूत उभी राहिली आहे.