राजगुरूनगर : राजगुरुनगर शहरातील वाडा रस्त्यावरील वाढती अतिक्रमणे आणि त्यातून होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या समस्येमुळे संतप्त झालेल्या राजकीय नेत्यांसह सर्वसामान्य नागरिकांच्या संतापाचा अखेर उद्रेक झाला. विविध पक्षातील राजकीय मंडळी, लोक्रातीनिधींसह नागरिकांनी आंदोलन पुकारत वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या रस्त्यालगतच्या अतिक्रमणांवर हल्लाबोल केला. या रस्त्यावरील अतिक्रमणे हटवून वाहतूक सुरळीत करण्यासाठी ठोस उपाययोजना तातडीने राबवा; अन्यथा शहर बंद आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला.
भीमशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष व कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष विजय डोळस यांनी खेड पंचायत समिती रस्त्यावर अतिक्रमण असलेले बांधकाम तोडीत आंदोलनाची सुरुवात केली. हुतात्मा फाउंडेशनचे अमर टाटीया, बाळासाहेब सांडभोर, ऍड. सुभाष होले, संदीप भोसले, माजी सरपंच मारुती सातकर, नगरसेवक मनोहर सांडभोर, राहूल आढारी, मंगेश गुंडाळ, संतोष भांगे, नितीन सैद, राजेंद्र सांडभोर, अविनाश कहाणे, बाळासाहेब कहाणे, कैलास दुधाळे, मिलिंद शिंदे, एड. मनीषा पवळे, बापूसाहेब नगरकर, मोहिंदर थिगळे, अविनाश गावडे, ऍड. निलेश आंधळे, दिनेश कड, वैभव घुमटकर, अनंत भालेकर, निलोफर मोमीन, बबन शिवले, राजन जांभळे, मनोज सावताडकर, ऍड. दीपक थिगळे, जयंत घोरपडे, सुनील थिगळे आदी नागरिक व व्यावसायिक या आंदोलनात सहभागी झाले होते.
-बालकाच्या मृत्यूमुळे संताप नागरिकांची निषेध फेरी
शहरातील रस्ते, गटर, पाणी पुरवठा लाईन यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. मुख्यत्वे नगरपरिषद, सार्वजनिक बांधकाम व महसुल विभाग, पोलीस प्रशासनाविरोधात अनेकांनी परखड टीका केली. शहरातील वाडा रस्त्यावर नेहमीच्या वाहतूक कोंडीने वाहनचालक, नागरिक हैराण झाले आहेत. गर्दीमुळे दोन दिवसांपूर्वी सहा महिन्यांच्या बाळाचा अपघाती मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर चर्चा करून उपाययोजना करण्याची मागणी करण्यासाठी रविवारी (दि. २५) शहरातील नागरिक एकत्र आले होते. यावेळी अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. शहरातून निषेध फेरी काढून प्रशासनाचे व अतिक्रमण करणाऱ्या दुकानदार, व्यावसायिकांचे लक्ष वेधले.
– नागरी समस्यांमध्ये मोठी वाढ
राजगुरुनगर शहरामधे नागरी समस्या दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहेत. यातील सर्वात गंभीर बाब म्हणजे शहरातून जाणारा मुख्य वाडा रस्ता आणि त्यावरील सततची होणारी वाहतूक कोंडी आहे. नुकताच या रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात आला; मात्र रस्त्याच्या दुतर्फा बेकायदेशीर आणि बेशिस्त पार्किंग, मोठमोठ्या इमारतीचे अतिक्रमण, रस्त्याच्याकडेला थाटलेले व्यवसाय आणि बेजबाबदार वाहनचालक या सर्वामुळे या रस्त्यावर पुणे-नाशिक रस्ता ते संगम गार्डन या भागात सतत वाहतूक कोंडी असते. वेळोवेळी मागणी करुनही ठोस उपाययोजना यावर होत नसल्याने नागरिक संतप्त झाले होते.