संग्रहित फोटो
चिखली प्रभाग क्रमांक १ मधील सुमारे साडेचार हजार मतदारांची नावे थेट प्रभाग क्रमांक ११ मध्ये टाकण्यात आल्याचे समोर आले आहे. त्याचप्रमाणे तळवडे येथील प्रभाग क्रमांक १२ मधील जवळपास १२०० मतदारांची नावे चिखली प्रभागात दाखल झाली आहेत. मतदार याद्या तपासताना हा गंभीर प्रकार उघड झाल्यानंतर नागरिकांसह संभाव्य इच्छुक उमेदवारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अनेक इच्छुक उमेदवारांची नावेही याद्यांतून गायब झाल्याचे समोर येत असून, त्यामुळे निवडणूक तयारीसंदर्भात त्यांची मोठी अडचण झाली आहे. याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी विधानसभानिहाय मतदार याद्या तयार करण्यात आल्याचे सांगत असले, तरी प्रत्यक्षात याद्यांतील बदलांमुळे तफावत वाढल्याचे मतदारांचे म्हणणे आहे.
विशेषत: ८० ते ९० वर्षे वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांसमोर ही मोठी समस्या निर्माण झाली आहे. चालणे-फिरणे कठीण असलेल्या या ज्येष्ठ मतदारांनी स्वतः हरकतीचे अर्ज घेऊन जाणे शक्य नसताना, अशा मोठ्या बदलांची जबाबदारी कोण स्वीकारणार, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. मतदारांची नावे चुकीच्या प्रभागात जाणे, काहींची नावे यादीतूनच वगळली जाणे, या प्रकारामुळे प्रभागातील मतदारांसोबत इच्छुक उमेदवारांच्याही मनात संभ्रम आणि नाराजी वाढली आहे. आगामी निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी मतदार यादीतील तफावत तातडीने दूर करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
“आम्ही दरवर्षी एकाच ठिकाणी मतदान करतो. पण आता नावच दुसऱ्या प्रभागात गेलं. वरिष्ठ नागरिकांना इतकं धावपळ करायला लावणं योग्य नाही.” — विठ्ठल जाधव, ज्येष्ठ नागरिक






