नागपूर : प्रेयसीला धक्का लागल्यानंतर रागाने पाहिल्यावरून झालेल्या वादात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तरुणांनी तिघांवर हल्ला करून जखमी केले. ही घटना इमामवाडा पोलीस ठाण्यांतर्गत मेडिकल चौकच्या व्हीआर मॉलमधील वेअर हाऊस बार आणि पबमध्ये घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, इंदोरा येथील रहिवासी साईप्रताप भंडारी हा मित्र तीर्थास बारसे, दर्शन कारोंडे आणि यश शेंडे यांच्यासोबत 7 जानेवारी साडेअकरा वाजता पबमध्ये पार्टी करण्यासाठी गेला होता. त्याचवेळी आरोपी शुभम महल्ले (रा. इंदोरा) हा सुद्धा त्याच्या आठ-दहा मित्रांसह तेथे आला होता. त्याच्यासोबत मुलीही होत्या. रात्री दीड वाजता, पार्टीमध्ये प्रेयसीला धक्का लागला आणि रागाने पाहिल्यावरून शुभमचा साई प्रतापसोबत वाद झाला.
साई प्रताप आणि त्याचे मित्र पार्टीतून बाहेर आले. व्हीआर मॉलच्या गेटजवळ शुभम महल्ले आणि त्याच्या साथीदारांनी साई प्रतापवर तरुणीकडे टक लावून पाहत असल्याचा आरोप करत हल्ला केला.
दरम्यान, साई प्रतापचा मित्र हितेश गोरखेडे आणि तीर्थास यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी त्यांनाही जखमी केले. यानंतर आरोपी तिघांनाही धमकावत कारने फरार झाले. साई प्रतापने घटनेची तक्रार इमामवाडा पोलिसात केली. पोलिसांनी मारहाण, दंगा आणि धमकावल्याचा गुन्हा नोंदविला आहे.