आमदार तानाजी सावंत यांच्या सुरक्षेत कपात (फोटो- सोशल मिडिया/टीम नवराष्ट्र)
आज राज्य सरकारची मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. यामध्ये अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. दरम्यान राज्य सरकारकडून मंत्री नसलेल्या नेत्यांच्या सुरक्षेत कपात केली जात आहे. शिवसेना पक्षाचे आमदार आणि माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली आहे. आमदार आणि नेत्यांना वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती. त्यामध्ये आता कपात करण्यात आली आहे, तानाजी सावंत मंत्री असताना त्यांच्या सुरक्षेसाठी 48 सुरक्षारक्षक तैनात होते. मात्र आता ते मंत्री नसल्याने त्यांची सुरक्षा काढून घेण्यात आली आहे.
राज्य सरकारने धोका नसलेल्या नेत्यांच्या सुरक्षेत कपात केली आहे. शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षातील नेत्यांची देखील सुरक्षा कपात करण्यात आली आहे. दरम्यान तानाजी सावंत यांच्या सुरक्षेसाठी 48 सुरक्षारक्षक तैनात होते. मात्र आता त्यांची सुरक्षेत कपात केली आहे. आता मंत्री नसल्याने त्यांच्याजवळ एकच सुरक्षारक्षक सुरक्षेसाठी तैनात असणार आहे. राज्य सरकारने धोका नसलेल्या आणि मंत्री नसलेल्या नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्याचे धोरण अवलंबवले असल्याचे पाहायला मिळत आहे.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना तानाजी सावंत हे आरोग्यमंत्री होते. त्यावळेस त्यांनी आपल्या सुरक्षेसाठी पुणे पोलिस दलातील 48 सुरक्षारक्षक तैनात करून घेतले होते. मात्र आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असलेल्या सरकारमध्ये तानाजी सावंत हे मंत्री नसल्याने त्यांची सुरक्षा काढून घेण्यात आलेली आहे. आमदार असल्याने केवळ आता 1 च सुरक्षारक्षक त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असणार आहेत.
तानाजी सावंत यांचा मुलगा बेपत्ता की अपहरण?
शिवसेनेचे नेते आणि माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा पुणे विमातळावरून बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. पुण्यातील सिंहगड रोड पोलीस ठाण्यात या प्रकरणी अपहरणाची तक्रार देण्यात आली असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र या सर्व घडामोडींमध्ये तानाजी यांनी पोलिसांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे.
सायंकाळी पाचच्या सुमारात तानाजी सावंत यांचे पुत्र ऋषिराज सावंत हे एका स्विफ्ट गाडीत बसून विमानतळावर गेले होते. त्यानंतर अचानक ऋषिराज सावंत हे बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली. या सगळ्या प्रकारानंतर तानाजी सावंत यांनी थेट पोलीस आयुक्तांचे कार्यालया गाठलं. त्यानंतर पुणे पोलिसांच्या कंट्रोल रुमलाही यासंदर्भात निनावी फोन आला. यानंतर तानाजी सावंत आणि सह पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भात माहिती दिली.
“दुपारी चार वाजण्याच्या सुमारास पोलिसांच्या कंट्रोल रूमला माहिती मिळाली की तानाजी सावंत यांच्या मुलाला कोणीतरी घेऊन गेलेलं आहे. ही माहिती मिळाल्यानंतर सर्व यंत्रणा सतर्क करण्यात आली. त्यांची माहिती घेणे सुरू झाले असून ते पुण्यावरून विमानाने गेले आहेत. त्यांचे विमान कोणत्या दिशेने आणि कुठे चालले आहे याची माहिती गोळा केली जात आहे. त्यांना परत आणण्यासाठी यंत्रणा काम करत आहे. याबद्दल सिंहगड रोड पोलीस ठाण्यात एक अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने क्राईम ब्रँचकडे या संदर्भातील तपास सोपवण्यात आला आहे. त्यांना परत सुखरूप आणण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत,” अशी माहिती सह पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी दिली.