अर्थसंकल्प झाल्यानंतर महायुतीची पत्रकार परिषद (फोटो- सोशल मिडिया/टीम नवराष्ट्र)
सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात सर्व क्षेत्रासाठी भरघोस निधीची तरतूद करण्यात आली आहे. दरम्यान यंदाच्या अर्थसंकल्पात लाडक्या बहिणीसाठी काय मिळणार याची उत्सुकता सर्वांना होती. कृषी, आरोग्य, जलयुक्त शिवार, ज्येष्ठ नागरिक अशा सर्व घटकांसाठी निधीची घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान लाडक्या बहीणींसाठी राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे. बजेट सादर केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अजित पवार यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प सादर केला आहे. अर्थसंकल्प सादर केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फडणवीस आणि पवार यांना कोपरखळी मारल्याचे समजते आहे. दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या व्यक्तव्याला देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी देखील प्रत्युत्तर दिले आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, गेल्यावेळेस देखील आम्ही तिघे होतो. आता फक्त खुर्च्यांची अदलाबदली झाली आहे. एकनाथ शिंदे यांच्या या वाक्यावर उपस्थितांमध्ये हशा पिकला. त्यावर बोलताना अजित पवार यांनी ते काही तुमच्या मनातून जाता जात नाही असे उत्तर दिले. त्यावर परत अदलाबदल झाली असली तरी टीम तीच असे म्हणत शिंदे यांनी सारवासराव करण्याचा प्रयत्न केला. राज्याच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा हा प्रकल्प असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. दरम्यान अदलाबदली झाली असली तरी बदलाबदली झालेली नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
अजित पवारांनी मांडलेल्या अर्थसंकल्पावर ठाकरेंची कडाडून टीका
विधानसभा निवडणूक काळात वारेमाप जाहिराती दिल्या. शेतकऱ्यांना कर्जमाफी, लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र आजच्या अर्थसंकल्पात शेतकरी, महिला आणि सामान्य जनतेची घोर निराशा झाली आहे. सरकारने जाहीर केलेला हा अर्थसंकल्प हा अंत्यत बोगस आहे. या अर्थसंकल्पातून राज्यातील जनतेच्या हाती काहीच लागले नाही. केवळ थापा मारण्यात आल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्र कर्जबाजारी झाला आहे. राज्य सरकारकडून केवळ महाराष्ट्र खड्ड्यात घालण्याचं काम सुरू झालंय. लाडक्या कंत्राटदारांनी हा अर्थसंकल्प गिळला आहे, अशा शेलक्या शब्दांत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अर्थसंकल्पावर टीका केली आहे.
पाच वर्षांत जीवनावश्यक वस्तूच्या किमती स्थिर ठेवण्यात आल्या नाहीत. तर शेतकऱ्यांच्या विजेच्या थकबाकीचे काय करणार ? हे स्पष्ट केले नाही तर शेतकऱ्यांसाठीच्या कर्जमाफी योजनेबाबत घोषणा केली नाही. मुंबईसाठी 64 हजार कोटी रुपयांची कामे हाती घेण्यात येणार आहेत. ही कामे सर्वसामान्यासाठी नाहीत तर केवळ हे सर्व कामे गुत्तेदारासाठी (कॉन्ट्रॅक्टर) आहेत, अशी टीका उद्धव ठाकरे केली.