File Photo : CM Devendra Fadnavis
नागपूर : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीनंतर जोरदार राजकारण रंगले आहे. अनेक मुद्द्यांवरुन महायुती सरकारला घेरले जात आहे. हिवाळी अधिवेशनामध्ये देखील विरोधकांनी टीकेची झोड उठवली. यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक राजकीय विषयावर भाष्य केले आहे. यावेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे देखील उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर आता अडचणीवर आणि मर्यांदावर मात करुन जनतेची सेवा करणार असल्याचे सांगितले आहे.
2014 मी मुख्यमंत्री झाल्यावर अनेकांना शंका
माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “महायुतीला विधानसभा निवडणुकीमध्ये भरघोष यश मिळाले. भाजपला देखील राजकीय जीवनातील उच्चांक 132 जागा मिळवता आल्या. फेक नॅरेटिव्हचा मोठा फटका आम्हाला लोकसभेला बसला होता. मात्र विधानसभेमध्ये लोकांचे मोठा पाठिंबा मिळाला. अर्थात या बहुमतामुळे आमची जबाबदारी देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कोणतेही बहुमत हे जनतेच्या अपेक्षा घेऊन येत असतात. अपेक्षा, आव्हान, अडचणी आणि मर्यादा देखील काम करताना येत असतात. पण यावर मात करुन जनतेच्या मनातील काम झाली पाहिजे, असा महाराष्ट्र तयार झाला पाहिजे. मी 2014 मला मुख्यमंत्री झालो तेव्हा अनेकांच्या मनामध्ये देखील शंका होत्या. हा मंत्री राहिलेला नाही तर मुख्यमंत्री म्हणून कसा काम करेल? अतिशय नवखं काम ह्यांना मिळालं आहे, सातत्याने विदर्भाच्या प्रश्नांवर बोलणारा व्यक्ती पश्चिम महाराष्ट्राचे काम कसे करेल असा प्रश्न निर्माण केला जात होता,” असे मत मुख्यमंंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
राजकीय घडामोडी वाचण्यासाठी येथे क्लिक करा
गडचिरोलीमध्ये निकरच्या लढाईची शक्यता
पुढे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “यापूर्वीच्या कार्यकाळामध्ये विदर्भातमध्ये काम केले पण त्याचबरोबर राज्यातील इतर कोणत्याच भागावर अन्याय होऊ दिला नाही. विदर्भामध्ये सिंचनाचे मोठ्या प्रमाणात प्रकल्प हाती घेतले. जवळ जवळ 80 सिंचन प्रकल्प पूर्ण केले. आता अनेक प्रकल्प पूर्णत्वापर्यंत आणले आहेत. पण त्याचबरोबर महाराष्ट्राच्या इतर भागातील वर्षानुवर्षे रखडलेले प्रकल्प देखील आपण पुन्हा सुरु केले आहेत. उद्योगधंदे, बांधकाम आणि महत्त्वाच्या भागांमध्ये उंच भरारी तेव्हाच्या पाच वर्षांमध्ये महाराष्ट्राने घेतली. गेल्या अडीच वर्षांत उपमुख्यमंत्री म्हणून जी संधी मिळाली त्यावेळी देखील उर्जा विभागामध्ये पुढच्या 25 वर्षाचा रोडमॅप तयार करुन ठेवला आहे. विजेचे दर आपण कमी करु शकू अशी परिस्थिती पुढील दोन ते तीन वर्षांमध्ये येईल. सहा नदी जोड प्रकल्पांची काम आपण हाती घेतली आहेत. ही सहा नदीजोड प्रकल्प महाराष्ट्राचा पूर्णपणे बदल करणारी आहेत. गडचिरोलीचा विकास होत आहे. नक्षलवाद कमी होत आहे. ज्या भागात आपण जात नव्हतो त्या भागांमध्ये आता खोलवर जाता येत आहे. निकरची लढाई होण्याची शक्यता आहे. यामधून आपण गडचिरोलीसारखं क्षेत्र हे बदलण्याचे काम आपण करणार आहोत. महाराष्ट्राच्या समोर सायबर गुन्हे हे मोठे आव्हान आहे. यावर आळा घालण्याचा प्रयत्न असणार आहे. सर्व आवास योजनांमध्ये मिळणाऱ्या घरांना सोलार दिले जाणार आहे. विदर्भात औद्योगिक इकोसिस्टीम उभारण्याचा प्रयत्न असणार आहे.जनतेने दिलेल्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न मी करणार आहे,” असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.
राजकीय घडामोडी वाचण्यासाठी येथे क्लिक करा
पुढे देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांनी उपस्थित केलेल्या ईव्हीएम मशीनवरील संशयावर मत व्यक्त केले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “केंद्राच्या मदतीने महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न आहे. सत्ता कधीही माझ्या डोक्यात जाणार नाही. सत्ता हे सेवा करण्याचा मार्ग आहे. झोपलेल्यांना जागे करता येते मात्र झोपेचे नाटक करणाऱ्या व्यक्तीला उठवता येत नाही. कॉंग्रेस पक्ष हे पूर्णपणे जाणतो की, ईव्हीएम मशीन हे पूर्णपणे सुरक्षित आहे. ईव्हीएमला आव्हान देणारे सर्व दावे खोटे ठरले आहेत. यासाठी कॉंग्रेस पार्टी काहीही करु शकली नाही. कॉंग्रेसची ही नीती राहिली की, निवडणूक हारली की ईव्हीएमला दोष देणार आणि ते निवडणूक जिंकले की लोकशाही जिंकली असं सांगतात. पण आता त्यांना उत्तर द्यायला माझी किंवा निवडणूक आयोगाची गरज नाही. कॉंग्रेसला उत्तर हे ओमर अब्दुला आणि ममता बॅनर्जी यांनी देखील दिले आहे,” असे प्रत्युत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.