खासदार संजय राऊत यांनी अजित पवार यांना मुख्यमंत्रिपदावरुन निशाणा साधला (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई : महायुती सरकारकडून लाडकी बहीण योजनेच्या डिसेंबरचा हप्ता देण्यासाठी तयारी सुरु झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निधी दिला असून याच आठवड्यामध्ये महिलांच्या खात्यामध्ये 1500 रुपये दिले जाणार आहेत. हा लाडकी बहीण योजना सहावा हप्ता असणार असून महिलांसाठी वर्षाचा शेवट चांगला होणार आहे. यावरुन आता महाविकास आघाडीने निशाणा साधला आहे.
लाडकी बहिण योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर बोजा आलेला आहे. यामुळे विरोधकांनी टीका केलेली असताना 2 लाख कोटीची तूट भरुन काढताना महसूल वाढीसाठी दारुच्या दुकानांचे परवाने वाढवणं गरजेच आहे, असे अजित पवार बोलले आहेत. यामुळे आता विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. याबाबत माध्यमांनी प्रश्न विचारला असता संजय राऊत म्हणाले की, , “लाडक्या बहिणींना 1500 हजार देण्यासाठी लाडक्या बहिणीचे भाऊ आणि नवऱ्यांना ते दारूडे करणार आहेत. प्या दारू. 1500 रुपयांसाठी संपूर्ण महाराष्ट्र ते दारूडा करणार असतील तर ते अत्यंत गंभीर आहे” असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्र राजकारणसबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे खासदार संजय राऊत म्हणाले की, “हे दारूची दुकाने वाढवणार आहेत. ड्राय डे कमी करणार आहेत. शॉप आणि मॉलमधून दारू विकण्याचं प्रपोजल आलं आहे. काही राज्यात घरपोच दारू पोहोचवण्याची स्किम आहे. तीही आणण्याचं चाललं आहे. लाडक्या बहिणींना 1500 रुपये देण्यासाठी काही करून दारू पोहोचवायची. बेवडे नवरे आणि भाऊ तयार करण्याचं काम सुरू आहे. हा महाराष्ट्रासाठी कलंक आहे. अजित पवारांसारखा नेता असा विचार करत असेल तर ते दुर्देव म्हणावे लागेल. यशवंतराव चव्हाण, फुले, शाहू आंबेडकरांचे फोटो लावणं अजितदादांनी बंद करायला पाहिजे” अशा कडक शब्दात संजय राऊत यांनी अजित पवारांवर जोरदार टीका केली आहे.
पुढे संजय राऊत म्हणाले की, “भविष्यात लाडकी बहिण योजना बंद करतील. लाखो कोटींचा खर्च आहे. निवडणुकीच्या आधी कोणतेही निकष न लावता मतांसाठी पैसे वाटले. आता निवडणुका झाल्यावर निकष लावता. आता दारूची दुकाने वाढवत आहात. 1500 रुपयांसाठी आपल्या घरात कोणतं विष आणलं जात आहे, ते बहिणींनी पाहिलं पाहिजे” 40 रुपयांचा लसूण आता 400 रुपयांवर गेला आहे. 1500 रुपये देता. जेव्हा बहीण मार्केटमध्ये जाते तेव्हा ती थैली रिकामी घेऊन येते. 1500 रुपयांत काहीही येत नाही” असे मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्र राजकारणसबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
फडणवीसांची उत्तरं थातूर मातूर
बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणावरुन विरोधकांनी महायुतीला राज्यात कायदा व सुव्यवस्था नसल्याचे म्हणत घेरले आहे. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना खासदार संजय राऊत म्हणाले की, “बीडची परिस्थिती अशी आहे की एका जिल्ह्यात राष्ट्रपती शासन लागू करावं. आपल्या घटनेत तशी तरतूद नाही. मी परिस्थिती सांगतो. तिथे सामाजिक राजकीय परिस्थिती गंभीर आहे. तिथे दंगल होईल, लोक रस्त्यावर येतील अशी परिस्थिती आहे. मुख्यमंत्र्यांनी बीडला गेलं पाहिजे. ते गृहमंत्री आहेत. त्यांच्या लाडक्या धनुभाऊला घेऊन जावं. त्यावर फडणवीस थातूर मातूर उत्तर देत आहेत. थातूरमातूर हा शब्द योग्य आहे. सरकारचे मंत्री बीडला जात आहे. काय काम आहे तिथे? बीडचा आरोपी तुमच्या मंत्रिमंडळात. तुमच्या खात्यात आहे,” असा घणाघात संजय राऊत यांनी केला आहे.