अबू आझमींच्या विधानावरून मुख्यमंत्री फडणवीस आक्रमक (फोटो- टीम नवराष्ट्र / सोशल मिडिया)
Abu Azmi Statement: समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी औरंजगेबाबद्दल केलेल्या वक्तव्यावरून वातावरण तापले आहे. अबू आझमी यांनी औरंगजेब एक उत्तम प्रशासक होता आणि त्याच्या काळात भारताचा जीडीपी अर्थात सकल राष्ट्रीय उत्पन्न २४ टक्के होतं, असा दावा समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी केला आहे. त्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. अबू आझमी यांना अर्थसंकल्पीय अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात आले आहे.
काय म्हणाले समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी?
मुघल सम्राट औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता. त्याच्या राजवटीत भारताची सीमा अफगाणिस्तान आणि बर्मा म्हणजेच आताचा म्यानमारपर्यंत पसरली होती. त्याच्या काळात भारताला ‘सोने की चिडीयाँ’ म्हटलं जात असे. औरंगजेबाच्या राजवटीत भारताचा जीडीपी 24 टक्के इतका होता. त्यामुळेच इंग्रज भारतात आले. तसंच छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यातील लढाई धार्मिक नव्हती. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यातील लढाई ही राजकीय होती.
देशात सध्या औरंगजेबाची प्रतिमा चुकीच्या पद्धतीने रंगवली जात आहे. औरंगजेबाने त्याच्या काळात अनेक मंदिरं उभारली होती. औरंगजेब हा क्रूर प्रशासक नव्हता. त्या काळातील लढाई ही धर्मासाठी किंवा हिंदू-मु्स्लीम अशी नव्हती, असं अबू आझमी यांनी सांगितलं. यावेळी अबू आझमी यांना औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांची ज्याप्रकारे हत्या केली, ती योग्य होती का, असा सवाल विचारण्यात आला. त्यावर अबू आझमी उत्तर न देता निघून गेले. त्यांच्या या वक्तव्यावरुन वाद निर्माण झाला आहे.
विधानपरिषदेत अबू आझमी यांच्या वक्तव्यावरून एकच गदारोळ उडाला. विधानपरिषदेत उद्धव ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी अबू आझमी यांनी केलेल्या विधानानंतर त्यांना तुरुंगात का टाकण्यात आले नाही असा सवाल मुख्यमंत्री फडणवीस यांना विचारलं. यावेळी उत्तर देताना, अबू आझमी यांना 100 टक्के तुरुंगात टाकले जाईल. अबू आझमी असो वा दुसरे कोणीही असो. छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांना सोडणार नाही. आवश्यकता असल्यास आम्ही वरच्या कोर्टात दाद मागू असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
Abu Azmi यांच्या वक्तव्याचे UP विधानसभेत पडसाद
अबू आझमी यांच्या वक्तव्यामुळे सत्ताधारी आणि विरोधी नेत्यांनी जोरदार आंदोलन करत आक्रमक पवित्रा घेतला. त्यांच्या वक्तव्याचे आता उत्तर प्रदेश विधीमंडळामध्ये देखील पडसाद पहायला मिळत आहे.
Abu Azmi यांच्या वक्तव्याचे UP विधानसभेत पडसाद; योगी आदित्यनाथ चांगलेच भडकले, सुनावले खडेबोल
उत्तर प्रदेशच्या विधीमंडळामध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी समाजवादी पार्टीवर जोरदार हल्लाबोल केला. समाजवादी पक्षाने अबू आझमी यांच्या विधानाचे खंडन करावे. त्यांना पक्षातून हाकलून लावा. नाहीतर त्याला उत्तर प्रदेशात घेऊन या, आम्ही त्याच्यावर उपचार करू, या कडक शब्दांत योगी आदित्यनाथ यांनी रोष व्यक्त केला आहे.