Photo Credit : Photo Credit
मुंबई: लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात सर्वाधिक जागा जिंकल्यानंतर काँग्रेस पक्षाचा आत्मविश्वास चांगलाच वाढला आहे. लोकसभेपाठोपाठ आता राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने मोर्चेबांधणी आणि रणनीती आखण्यास सुरूवात केली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील हॉटेल लिलामध्ये आज (04 ऑगस्ट) विधानसभेच्या जागावाटपासंदर्भात चर्चा करण्यासाठी काँग्रेसच्या दोन महत्वाच्या बैठका होणार असल्याची माहिती समोर आली आहे. आज होणाऱ्या या बैठकीत काँग्रेस पक्षाकडून आगामी विधानसभा निवडणुकीत किती जागा लढण्याचा निर्णय घेतला जातो, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
महाविकास आघाडीच्या विधानसभेच्या जागावाटपासंदर्भात गठित केलेल्या काँग्रेसच्या समितीची प्रदेश काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. सकाळी 10 वाजता पहिली आणि दुपारी 12 वाजता दुसरी बैठक होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील जागावाटपासंदर्भात काँग्रेसने 3 सदस्यांची वेगळी समिती तयार केली असून या समितीत खासदार वर्षा गायकवाड, भाई जगताप आणि अस्लम शेख यांचा समावेश आहे.
याशिवाय राज्यातील जागावाटपसंदर्भात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, पृथ्वीराज चव्हाण, नितीन राऊत, नसीम खान आणि सतेज पाटील यांची समिती तयार करण्यात आली आहे. तर आजच्या बैठकीलाया बैठकीला प्रदेश काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले विधिमंडळ बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, पृथ्वीराज चव्हाण, वर्षा गायकवाड, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.