Chandrapur News: कर्जमाफीचा निर्णय कधी? चंद्रपूरमध्ये 3.5 लाख शेतकरी प्रतीक्षेत, सातबारा कोरा होणार का?
निवडणुकांच्या काळात सत्ताधारी पक्षांकडून संपूर्ण कर्जमाफीचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, अद्याप ठोस निर्णय न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढत आहे. जिल्ह्यात यावर्षी सततच्या अतिवृष्टी, काही भागांत दुष्काळसदृश परिस्थिती, कीड व रोगराई यामुळे कापूस, धान, सोयाबीन आणि तूर या प्रमुख पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात विविध ठिकाणी शेतकरी संघटनांकडून आंदोलने करण्यात आली आहेत. चंद्रपूर शहरासह वरोरा, बल्लारपूर आणि ब्रह्मपुरी तालुक्यांत शेतकऱ्यांनी निदर्शन करत कर्जमाफीची मागणी लावून धरली आहे. काही ठिकाणी चक्काजाम आंदोलनही करण्यात आले. सरकारने दिलेले आश्वासन तातडीने पूर्ण करावे, अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशारा शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी दिला आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
कर्जमाफीबाबत अद्याप शासनाने योजना जाहीर केलेली नाही. प्रथम सकृतदर्शनी थकीतबाकी खात्यांची माहिती शासनाला पाठविली जात आहे. यात जिल्हा मध्यवर्ती बँकेने ७९ हजार खात्यांची माहिती अपलोड केली असून इतर बँकांमार्फत माहिती देणे सुरू आहे, अशी माहिती सूत्राने दिली.
दरम्यान, प्रशासनाकडून शेतकऱ्यांच्या मागण्यांची नोंद घेण्यात येत असून शासनस्तरावर प्रस्ताव पाठवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, प्रत्यक्ष निर्णय केव्हा होणार, याबाबत अद्याप अनिश्चितता आहे. सरकारने लवकरात लवकर कर्जमाफी जाहीर करावी, अशी जिल्ह्यातील शेतकऱ्यांची एकमुखी मागणी आहे.
मुंबई महापालिका बजेटमधील ‘आरोग्य डिजिटल क्रांती’वर प्रश्नचिन्ह! जुन्याच योजनांची पुन्हा घोषणा?
सरकारने त्यांच्या जाहीरनाम्यात कर्जमाफीचा शब्द दिला होता. तसेच २९ ऑक्टोबर २०२५ ला शेतकरी नेत्यांसोबत आंदोलनानंतर झालेल्या चर्चेत त्यांनी सातबारा कोरा करून देण्याचे मान्य केले होते. सरकारने ३० जून २०२५ पर्यंतचे संपूर्ण कर्ज संपवून सातबारा कोरा करावा.- अॅड. वामनराव चटप, माजी आमदार
शेतकऱ्यांच्या मते, सध्या शेती करणे परवडणारे राहिलेले नाही. बियाणे, खत, कीटकनाशके, मजुरी, सिंचन आणि वाहतूक यांचा खर्च सातत्याने वाढत आहे. दुसरीकडे, पिकाला हमीभाव मिळत नसल्याने उत्पन्न घटत आहे. या परिस्थितीत कर्जमाफी हा एकमेव दिलासा असल्याचे शेतकरी सांगत आहेत. कर्जमाफी केवळ आर्थिक मदत नाही, तर शेतकऱ्यांच्या जगण्याला आधार देणारी गरज आहे. कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला शेतकरी मानसिक तणावात असून अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे, अशी भावना आंदोलक शेतकऱ्यांनी व्यक्त केली.






