संग्रहित फोटो
मुंबई : सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील एका महिला डॉक्टरला पोलिसांच्या अनन्वीत छळाला कंटाळून आत्महत्या कारावी लागली ही घटना पोलीस विभागाला लाज आणणारी आहे. गृहविभागावर फडणवीस यांचे नियंत्रण नाही, फलटणची घटना गृहविभागाच्या अब्रुची लक्तरे वेशीवर टांगणारी आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जनाची नाही तर मनाची तरी वाटावी आणि तात्काळ गृहमंत्रीपदाचा राजीनामा देऊन राज्याला पुर्णवेळ गृहमंत्री द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.
सातारा जिल्ह्यातील घटनेप्रकरणी भाजपा महायुती सरकार व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी खरपूस समाचार घेतला, ते पुढे म्हणाले की, “सदरक्षणाय खलनिग्रहणाय” हे महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य आहे. याचा अर्थ सज्जनांचे रक्षण करणे आणि दुर्जनांचा नाश करणे आहे पण आपल्या पोलीसांमध्ये गुंड, मवाली, बलात्कारी अशा दुर्जन प्रवृत्तींना मोकाट सोडून सज्जनांना त्रास देण्याची प्रवृत्ती बळावत आहे आणि त्याला सर्वस्वी देवेंद्र फडणवीस हेच जबाबदार आहेत. पोलिस विभागाचा कारभार पाहून फडणवीस यांना लाज वाटली पाहिजे. पण घटना कितीही गंभीर घडली तरी फडणवीसांना त्याचे काहीही वाटत नाही. फलटणची घटना ही काही पहिली घटना नाही. स्वारगेट बस स्थानकात एसटी बसमध्ये एका महिलेवर बलात्कार झाला त्यावेळी गृहराज्यमंत्र्यांनी केलेले विधान तर निर्लज्जपणाचा कळस होते. रावेरमध्ये केंद्रीय मंत्र्याच्या मुलीची छेड काढली पण कारवाई होत नाही हे पाहून मंत्र्यालाच पोलिस स्टेशनमध्ये धरणे धरावे लागले. आका, खोक्या, ही देण फडणवीस यांनी महाराष्ट्राला दिली आहे. आता ते सारवासारव करतील, तो मी नव्हेच अशा अविर्भावात आम्ही हे केले. ते केले अशा वल्गणा करतील पण ते जर खरेच धर्माला मानत असतील तर फलटणच्या घटनेतील नराधमांच्या मुसक्या आवळा, असेही सपकाळ म्हणाले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अराजक निर्माण करणारी संस्था
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही एक अनोंदणीकृत संस्था आहे. या संघटनेमुळे देशात अराजकता निर्माण होईल, जाती जातींत, धर्माधर्मांत भांडणे होतील असे लेखी स्वरूपातील पत्र खुद्द तत्कालीन गृहमंत्री, लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी लिहून ठेवलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी महोत्सवाच्या औचित्याने संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी नागपूर येथील व्हरायटी चौकात पूजनीय महात्मा गांधीजी यांना पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले. जी संघटना केवळ महात्मा गांधीजींच्या तत्वज्ञानाचा, त्यांच्या विचारांचा द्वेष करण्यासाठी निर्माण झाली, त्या संघटनेने आपल्या शताब्दी महोत्सवानिमित्त महात्मा गांधीजींना नतमस्तक होणे म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपला वैचारिक पराभव मान्य केला आहे. त्यामुळे आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपली संघटना बरखास्त करावी अशी काँग्रेस पक्षाची संघाचे १०० वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त मागणी आहे. काही वर्षांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला भारतीय राष्ट्रध्वज मान्य नव्हता. पण अलीकडच्या काळात कुणीतरी बाहेरच्या माणसाने तिथे तिरंगा फडकवल्याने नाईलाजास्तव संघाने तिरंगा स्वीकारला मात्र अद्यापही त्यांनी भारतीय संविधान स्वीकारले नाही. त्यामुळे संघाने त्यांची संघटना बरखास्त करावी, आपल्या संस्थेची नोंदणी करावी, महात्मा गांधीजी यांचे एक चित्र आपल्या मुख्यालयात लावावे आणि भारतीय राज्यघटनेला अभिप्रेत सशक्त भारत घडवण्याकरिता पुढील वाटचाल करावी अशी आमची अपेक्षा आहे, असं सपकाळ म्हणाले.






