संग्रहित फोटो
महापालिका निवडणुकीसाठी जागा वाटपाच्या चर्चा सुरु हाेण्याआधीच महाविकास आघाडीत काेणता घटक पक्ष असावा यावरच चर्चा सुरु आहे. महाविकास आघाडीत काॅंग्रेस, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काॅंग्रेस, ठाकरेंची शिवसेना यांचा समावेश हाेता. निवडणुक प्रक्रीया सुरू झाल्यानंतर राष्ट्रवादी काॅंग्रेसचे दाेन्ही गट एकत्र येण्याची चर्चा रंगली. प्रशांत जगताप हे शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष हाेते, त्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काॅंग्रेस साेबत जाण्यास विराेध दर्शविला. त्यामुळे त्यांच्यावर राजीनामा देण्याची वेळ आली.
काॅंग्रेसच्या प्रदेशच्या नेतृत्वाने दाेन्ही राष्ट्रवादी काॅंग्रेसबराेबर एकत्र जाण्याससंदर्भात पुण्यातील स्थानिक काॅंग्रेस नेत्यांना हिरवा सिग्नल दिला हाेता. त्यानुसार चर्चाही सुरु झाली हाेती. मुंबई येथे गुरुवारी झालेल्या बैठकीत प्रदेश काॅंग्रेसच्या नेत्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काॅंग्रेसबराेबर जाऊ नये अशी भुमिका घेतली. यामुळे पुण्यात महाविकास आघाडीचे गणित बिघडले आहे.
काॅंग्रेसच्या नेतृत्वाने आप, ठाकरेंची शिवसेना, वंचित बहुजन आघाडी, रासप या पक्षांबराेबर आघाडी करावी असे आदेश दिले आहेत. त्यातच ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांची युती झाली आहे. तसेच काॅंग्रेसने मनसेबराेबर जाण्यास विराेध केला आहे. यामुळे आता पुण्यात काॅंग्रेसला एकला चालाे रेची भुमिका घेण्याची वेळ आली आहे. स्थानिक नेत्यांनी प्रदेश काॅंग्रेसने घेतलेल्या या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. वास्तविक हा निर्णय घ्यायचा हाेता, तर आधी घेणे गरजेचे हाेते. पंधरा दिवस आम्ही चर्चा करीत बसलाे, आता पुन्हा सुरुवात करावी लागणार आहे.
भाजप वगळता सर्वच पक्षांत उलथापालथ
महाविकास आघाडीत अद्याप काेणताही ठाेस निर्णय हाेत नाही. दरराेज वेगवेगळ्या घडामाेडी हाेत आहेत. काेणत्या जागा मिळणार? उमेदवार काेण असेल याचा अंदाज काेणालाही येत नाही. त्यामुळे आघाडीतील सर्वच पक्षांतील इच्छुक कार्यकर्ता अस्वस्थ झाला आहे. यातूनच पुढील काळात पक्षांतराचे प्रमाण वाढण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. सर्वच प्रभागांत उमेदवार भाजपला मिळण्याची शक्यता अधिक आहे. महाविकास आघाडीत अद्यापही जुळवाजुळवच झाली नाही. महायुतीत भाजपने शिंदेंच्या शिवसेनेला साेहळा जागा देण्याची तयारी दाखवली आहे. त्यावर पक्षाचे नेतृत्व काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






