मुंबई : महाराष्ट्रासह इतर राज्यामध्ये राज्यसभा (Rajya Sabha) कार्यक्रम जाहीर झाला. यानंतर भाजपने आपल्या उमेदवारांची नावे (BJP Rajya Sabha candidate) जाहीर केली आहे. महाराष्ट्रासह मध्य प्रदेश (MP), ओडिसा व गुजरात (Gujarat) येथील राज्यसभेसाठी भाजपने जाहीर केलेल्या नावांमध्ये अनेतक बाहेरून आलेल्या नेत्यांना संधी देण्यात आली आहे. यावरुन आता कॉंग्रेसने (Congress) भाजपवर निशाणा साधला आहे. कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी भाजपकडे नेतृत्व नसल्यामुळे ते आयारामांना संधी देत आहेत असा घणाघात नाना पटोले यांनी केला आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर निशाणा साधला. राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाला आयात केलेल्या लोकांना उमेदवारी द्यावी लागली. जगातील सर्वात मोठा पक्ष व ‘विश्वगुरु’ असे नेतृत्व असल्याच्या वल्गणा करणाऱ्यांकडे राज्यसभेसाठी उमेदवार नसावा यातूनच भाजपा हा हवा भरलेला फुगा आहे तो कधीही फुटू शकतो हे दिसते. निष्ठावंतांना वंचित ठेवले. आयारामांना उमेदवारी आणि निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलणे हीच भाजपाची पद्धत आहे, अशी टीका नाना पटोले यांनी केली.
राज्यसभेची उमेदवारी आयात केलेल्या लोकांना देऊन कार्यकर्त्यांनी केवळ सतरंज्याच उचलाव्या हा संदेश भाजपाने दिलेला आहे. पक्ष वाढवण्यासाठी जे कार्यकर्ते आयुष्यभर मेहनत करतात त्यांना भाजपा संधी देत नाही. भिती दाखवून, दरोडे टाकून दुसऱ्या पक्षातील लोकांना भाजपात घेणे, दुसऱ्यांचे पक्ष फोडणे, चोरणे हेच काम भाजपा करत आहे. भाजपामध्ये नेतेच नाहीत. ज्यांना ते ‘डिलर’ म्हणत होते त्यांनाच आता ‘लिडर’ म्हणण्याची वेळ भाजपावर आली आहे. पंतप्रधानांनी ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांना पक्षात घेऊन राज्यसभेची उमेदवारीही दिली हेच भाजपाचे पार्टी विथ डीफरन्स आहे का? भाजपाचे खायचे व दाखवायचे दात वेगळे आहेत, असा घणाघात नाना पटोले यांनी केला.
दरम्यान, काँग्रेस पक्षाने ज्येष्ठ नेते चंद्रकांत हंडोरे यांना राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. हंडोरे हे काँग्रेस पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते आहेत, संघटना बांधणीत त्यांचे मोठे योगदान आहे, तसेच त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. काँग्रेस पक्षाने हंडोरे यांनी उमेदवार देऊन कार्यकर्त्यांचा सन्मान केला आहे. चंद्रकांत हंडोरे यांचा विजय नक्की आहे, दगाफटका करण्यास काहीही वाव नाही, असा विश्वास नाना पटोले यांनी यावेळी व्यक्त केला.