सोलापूर दक्षिण मतदारसंघात काँग्रेसकडून दिलीप माने यांना उमेदवारी जाहीर करूनही ऐन वेळी एबी फॉर्म नाकारण्यात आला
महाविकास आघाडी आणि महायुतीत विधानसना निवडणुकीच्या काही जागांवर तिढा सुटलेला नाही. ज्या जागांवर तिढा आहे तीथे काही उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आले होते. दरम्यान सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात काँग्रेसकडून माजी आमदार दिलीप माने यांची उमेदवारी घोषित करण्यात आली होती. मात्र ऐन वेळेला एबी फॉर्म नाकारण्यात आला. त्यामुळे दिलीप माने यांना आज अश्रू अनावर झाले. त्यांनी थेट अपक्ष अर्ज दाखल केला आहे.
दिलीप माने यांना सोलापूर दक्षिण मतदारसंघातून कॉंग्रेसकडून विधानसभेसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. मात्र आज अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी पक्षाने त्यांना एबी फॉर्म नाकारला. त्यामुळे दिलीप माने यांनी अपक्ष लढवण्याचा निर्णय घेतला आहे. या मतदारसंघातून ठाकरे गटाने आधीच अमर पाटील यांना उमेदवारी जाहीर करून एबी फॉर्मही दिला होता. त्यामुळे येथे ठाकरे गट विरुद्ध कॉंग्रेस असा वाद निर्माण झाला होता.
हेही वाचा-PM Narendra Modi : PM नरेंद्र मोदींनी मागितली जनतेची माफी; नेमकं कारण काय? वाचा सविस्तर
तर दुसरीकडे कॉंग्रेस महाविकास आघाडीत राहून आघाडी धर्म पाळत स्वतः च्या जागा घालवत असल्याचं माने यांनी म्हंटलं आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांना अश्रू अनावर झाले. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस कुमकुवत भूमिका घेत असल्याचंही माने यांनी म्हटलं आहे. माने यांनी अपक्ष फॉर्म भरल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांकडून देखील कॉंग्रेस विरोधात तीव्र भावना व्यक्त करण्यात आल्या आहेत.
अमर पाटील यांना ठाकरेंनी उमेदवारी जाहीर करुन एबी फॉर्मही दिला. याच दरम्यान दिलीप माने यांच्या कार्यकर्त्यांनी बैठकांचा सपाटा सुरु केल्यावर काँग्रेसने माने यांना उमेदवारीसह एबी फॉर्म खा. प्रणिती शिंदे यांच्याकडे सपूर्द केल्याचा निरोप शहराध्यक्ष चेतन नरोटे यांना मिळाला. त्यामुळे माने समर्थकांसह काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. दरम्यान शिवसेनेचे संपर्क प्रमुख अनिल कोकिळ यांनी ही जागा शिवसेनेचीच असून अमर पाटील यांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एबी फॉर्म दिल्याचे सांगितले. यामुळे दक्षिणच्या उमेदवारीबाबत महाविकास आघाडीमध्ये मोठा पेच निर्माण झाला होता.
हेही वाचा-Parvati Constituency Politics: माधुरी मिसाळ की अश्विनी कदम; कसे आहे पर्वतीचे राजकीय समीकरण?
अस्वस्थ असलेल्या काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांनी दक्षिण सोलापूर मतदारसंघात उमेदवारी मिळण्यासाठी सिंहगर्जना केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून दिवसरात्र कार्यकर्ते मतदारांमध्ये काम करत आहेत. दक्षिण मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. या बाल्लेकिल्यात काँग्रेसला विश्वासात न घेता शिवसेना ठाकरे गटांने परस्पर उमेदवारी देऊन एबी फॉर्म दिल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळी आहे. दिलीप माने यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
माझ्या वडीलांवर बंडखोरीची वेळ आली होती तशीचं वेळ माझ्यावर आली आहे. माझा अंत पाहू नका नाही तर जिल्ह्यातील ११ मतदारसंघात बंडखोर उभे करेन असा थेट इशारा दिलीप माने यांनी दिला होता. त्यांच्या या इशाऱ्यामुळे आणि आक्रमक पवित्र्यामुळे महाविकास आघाडीत पेच निर्माण झाला होता. दिलीप माने यांना उमेदवारी जाहीर होत नसल्याने अस्वस्थ कार्यकर्ते माने यांच्या निवासस्थानी हजारोंच्या संख्येनी गर्दी केली होती. दिलीप माने ‘तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है’ असा नारा देत कार्यकर्त्यानी घोषणा दिल्या होत्या. वातावरण तणावपूर्ण होत असताना काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी माने यांच्या निवासस्थानी भेट देत संतप्त कार्यकर्त्याना शांत केलं होतं. अखेर आज दिलीप माने यांना एबी फॉर्मही नाकारण्यात आला. त्यामुळे त्यांनी उपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.