Photo : Agitation
अमरावती : ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचून ठिय्या आंदोलन केले. सोयाबीन, तूरीसह शेतमालाला भाव मिळावा, या मागणीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे दिसून आले. या कार्यकर्त्यांनी गुरुवारी दुपारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. यादरम्यान, शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या वाहनांचा ताफा जिल्हाधिकारी कार्यालयासमोरून जात असताना संतप्त शिवसैनिकांनी त्यांच्या वाहनांच्या दिशेने तूर आणि कापूस फेकला. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण होते.
हेदेखील वाचा : राज्यातील सर्व ऊसतोड कामगारांना आता मिळणार ओळखपत्र; सर्वेक्षणानंतर घेतला जाणार निर्णय
शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे हे जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आयोजित आढावा बैठकीला उपस्थित राहण्यासाठी जात असताना त्यांच्या ताफ्यावर तूर, कापूस फेकण्यात आला. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. नाफेडच्या दोन्ही यंत्रणांकडे नोंदणी केलेल्या सोयाबीन खरेदीसाठी सरकारने ६ फेब्रुवारी ही मुदत दिली आहे. पण, नोंदविलेल्या दीड हजार शेतकऱ्यांच्या सोयाबीनच्या खरेदीच आव्हान आहे. ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचून ठिय्या आंदोलन केले.
दरम्यान, पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या दरम्यान ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाचीदेखील झाली. शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख पराग गुडधे हे कार्यकर्त्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयाचे मुख्य प्रवेशद्वार उघडून आत शिरले. त्यांनी सोबत सोयाबीन, तूर आणि कपाशी आणली होती.
हेदेखील वाचा : Pune GBS News: ‘जीबीएस’बाबत पुणे महानगरपालिका सतर्क; जलप्रदूषित भागात शुद्धीकरण प्रकल्प उभारण्याचा निर्णय