आटपाडी : आटपाडी तालुक्यांमध्ये व्हाॅट्सअप, फेसबुक व इंस्टाग्रामवरील फेक अकाउंटवरून अश्लिल मेसेज पाठवून विनाकारण बदनामी केल्याप्रकरणी आटपाडीतील माजी उपसभापतीवर गुन्हा दाखल झाला अाहे. याबाबत राष्ट्रवादीच्या महिला जिल्हा उपाध्यक्ष अनिता पाटील यांनी सायबर क्राईम कडे तक्रार केली होती. सायबर क्राईम विभागाने याचा तपास जलद गतीने करून आटपाडी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंद केला होता. या अनुषंगाने माजी उपसभापती रुपेश देशमुख यांना अटक केली होती.
पाटील यांना बदनामी होईल अशा कमेंट पाठवल्या होत्या. अशा प्रवृत्तीच्या व्यक्तींना पोलिसांनी कारवाई करावी व पुढील काळामध्ये महिलांना असा कोणताही त्रास झाला तरी आम्ही ते सहन करणार नाही, असे अनिता पाटील यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.
संशयितास अटक केल्यानंतर माझ्याकडून चुकून झाले आहे, अशी कबुली दिली आहे. फेक अकाउंट द्वारे असे अनेक गुन्हे ग्रामीण भागात घडत आहेत. तरी असे अश्लील मेसेज पाठवण्यामागे नक्की कोणाचा हात आहे. याचा तपास पोलिसांनी करावा. ज्या पक्षांमध्ये ते काम करतायेत त्या पक्षाची भूमिका काय राहील ? हेही त्या पक्षाने प्रसिद्ध करावे, अशी मागणी पाटील यांनी केली.
कारवाई करा, अन्यथा आंदोलन
माझ्या बाबतीत जे घडले आहे. ते इतर महिलेच्या बाबतीत घडू नये, माझ्या बाबतीमध्ये जे घडले आहे त्यात जे दोषी असतील त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई करावी अन्यथा महिला राष्ट्रवादीच्यावतीने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा पाटील यांनी िदला.