अवकाळी पावसाने हातातोंडाशी आलेली पिके पाण्यात! (Photo Credit - X)
पुणे/नाशिक: गेल्या आठवडाभरापासून राज्यातील विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रासह कोकणात मुसळधार पावसाच्या सरी कोसळत आहेत. या परतीच्या पावसाचा सर्वाधिक फटका बळीराजाला बसला आहे. हातातोंडाशी आलेला कांदा, सोयाबीन यासह वेचणीवर आलेला कापूस, मका, भाजीपाला आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कोकण आणि पुणे जिल्ह्यातील भातकापणीची कामे पूर्णपणे ठप्प झाली असून, अनेक ठिकाणी भातशेती अक्षरशः पाण्याखाली गेली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाची क्षेत्रे सक्रिय झाल्यामुळे ऑक्टोबर अखेरपर्यंत राज्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे शेतकरी धास्तावले आहेत. मध्यपूर्व अरबी समुद्रावर सध्या कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. हा पट्टा पुढील तीन ते चार दिवस उत्तर दिशेला सरकणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रात किनारपट्टी लगतच्या भागासह इतर काही भागांमध्ये मोठा पाऊस होऊ शकतो, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. हे कमी दाबाचे क्षेत्र महाराष्ट्र किनारपट्टीजवळून प्रवास करणार असल्याने, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण अधिक असेल. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात मात्र राज्यातील हवामान कोरडे होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
द्राक्षाच्या ऑक्टोबर छाटणीचा हंगाम सुरू झाला असताना बागांमध्ये पावसाचे पाणी साचून राहिले आहे, त्यामुळे छाटणीची कामे करणे अवघड झाले आहे. नाशिक जिल्ह्यातील निफाड, दिंडोरी, कळवण, मालेगाव यांसारख्या प्रमुख द्राक्ष उत्पादक क्षेत्रांवर अतिवृष्टीचा मोठा परिणाम झाला आहे. यंदा सततच्या ओल्या हवामानामुळे द्राक्षांवर बुरशीजन्य संसर्ग आणि असमान फळधारणा होण्याची शक्यता आहे.
कृषितज्ज्ञांनी स्पष्ट संकेत दिले आहेत की, याचा थेट परिणाम नाशिकच्या द्राक्षाच्या गुणवत्तेवर आणि निर्यात क्षमतेवरही होणार आहे. द्राक्षपंढरी म्हणून ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्याचा देशाच्या एकूण द्राक्ष निर्यातीत सुमारे ६० टक्के वाटा असतो. मागील वर्षी १.५७ लाख टन द्राक्षांची विक्रमी निर्यात झाली होती, परंतु यंदा नैसर्गिक संकटांमुळे छाटणीपूर्वीच अनेक द्राक्षबागा उद्ध्वस्त झाल्याचे चित्र आहे.
Cyclone Montha: ‘मोंथा’मुळे समुद्र भयानक खवळला; २४ तासांत कोकणात मुसळधार, किल्ल्याकडे जाणारी होडी…






