दादर परिसरातील कबुतर खाना बंद रहावा या मागणीसाठी मराठी एकीकरण समितीने आंदोलन केले (फोटो - सोशल मीडिया)
Dadar Kabutar Khana news : मुंबई : दादरमधील कबुतरखान्यावरुन जोरदार वाद निर्माण झाला आहे. लोकप्रिय असलेला हा कबूतरखाना मुंबई पालिकेकडून बंद करण्यात आला आहे. सार्वजनिक ठिकाणी कबूतरांना खायला घालण्याबाबत मुंबई हायकोर्टाने निकाल दिला. तसेच कबूतरांमुळे अनेकांना दम्याचा त्रास होत असल्यामुळे लोकांच्या आरोग्याला प्राधान्य देत कबूतर खाना बंद करण्यात आला आहे. कबूतरखानाच्या या वादाला आता धार्मिक वादाचे स्वरुप आले आहे. जैन समाजाच्या विरोधात मराठी एकीकरण समितीने आंदोलन पुकारले आहे.
मुंबईमधील कबूतरखाने हा वादाच्या भोवऱ्यामध्ये अडकले आहेत. कबूतरखाने हे हाय कोर्टाच्या निर्णयानंतर बंद करण्यात आले. कबूतरखान्यावर मुंबई पालिकेने ताडपत्री देखील टाकली होती. मात्र जैन समाजाने या निर्णयाला तीव्र विरोध केला. तसेच ही ताडपत्री काढून कबुतरांना खायला दाणापाणी देखील टाकले. यामुळे वाद चिघळला आहे. पक्ष्यांचे खाण्याचे हाल होत असल्यामुळे जैन समाजाने कबूतरखाने सुरु ठेवण्याची मागणी केली आहे. आता जैन समाजाविरोधात मराठी एकीकरण समितीने आंदोलन केले आहे. यामुळे दादरमधील या भागामध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
कबुतरखाना परिसरामध्ये मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले आहे. कबूतरखाना बंदी कायम राहिली पाहिजे अशी मागणी समितीकडून केली जात आहे. समितीने आक्रमक पवित्रा घेतल्यामुळे आंदोलनाच्यापूर्वीच पोलिसांनी कार्यकर्त्यांना नोटीस पाठवल्या होत्या. मात्र सकाळी आंदोलनकर्ते जमू लागल्यामुळे पोलिसांनी समितीच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. यावेळी मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
कबुतरखाना बंदीचा विषय धार्मिक नाही. कबुतरखाना बंदीचा हा विषय सामाजिक आहे. त्यामुळे कबुतरखाना बंदीला जातीयवादाचा रंग देऊ नका. त्या दिवशी जैन समाजाने जे आंदोलन केले, त्यावेळी तुम्ही जैन समाजाच्या आंदोलकांवर काही कारवाई केली का, असा सवाल यावेळी आंदोलकांनी केला. तसेच हाय कोर्ट व सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाचा सन्मान करावा अशी मागणी मराठा एकीकरण समितीकडून केली जात आहे. त्यामुळे कबुतरखाना बंदीचा वाद हा वाढला आहे.
कबूतरखाना परिसरात पोलिसांचा फौजफाटा
दादर परिसरातील या बंद करण्यात आलेल्या कबूतरखाना परिसराला छावणीचे स्वरुप आले आहे. या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्याचबरोबर या कबुतर खान्याच्या आजूबाजूला असलेल्या सोसायटीमधील रहिवासी हे बंदीला पाठींबा करत आहेत. अनेक जण हे आंदोलनामध्ये देखील उतरत आहेत. त्याचबरोबर जैन समाजाकडून फाडण्यात आलेली ताडपत्री देखील पोलिसांनी बंदोबस्तामध्ये पुन्हा एकदा लावली आहे. मात्र तरीही त्या ताडपत्रीवर कबूतरे येऊन बसत आहेत. यामुळे हा कबूतरखान्याचा वाद वाढताना दिसत आहे.