उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला आणखी एक धक्का; बड्या नेत्याने हाती बांधलं घड्याळ
दापोली: दापोली विधानसभा मतदारसंघातील उद्धव ठाकरे गटाचे माजी आमदार संजय कदम लवकरच शिवसेनेत प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे.मुंबईत झालेल्या बैठकीत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम आणि संजय कदम यांच्यात महत्त्वपूर्ण चर्चा झाली. या चर्चेनंतर संजय कदम यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. याआधी राजन साळवी यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली होती, आणि आता संजय कदम यांच्या संभाव्य पक्षांतराने दापोली मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत संजय कदम लवकरच मुंबईत शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश करणार आहेत. या पार्श्वभूमीवर, रामदास कदम यांच्या ‘पालखी बंगल्या’वर संजय कदम आणि रामदास कदम यांनी एकत्र स्नेहभोजन घेतल्याचेही सांगितले जात आहे.
Abu Azmi यांच्या वक्तव्याचे UP विधानसभेत पडसाद; योगी आदित्यनाथ चांगलेच भडकले, सुनावले खडेबोल
संजय कदम हे दापोली विधानसभा मतदारसंघातील उद्धव ठाकरे गटाचे पराभूत उमेदवार आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) कडून योगेश कदम यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यांनी दापोलीत अभूतपूर्व विजय मिळवत ठाकरे गटाचे संजय कदम यांना पराभूत केले होते.
दरम्यान, याआधी राजन साळवी यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली होती. आता संजय कदमही शिंदे गटात जाणार असल्याने कोकणातील ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. त्यांच्या संभाव्य पक्षांतरामुळे दापोलीच्या राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अमेरिकेतील हवाईमध्ये किलाउआ ज्वालामुखीचा भीषण उद्रेक; लाव्हा 150 फूटांपेक्षा अधिक उंचीवर
उद्धव ठाकरे यांचे एक एक शिलेदार त्यांची साथ सोडत असल्याचे चित्र सध्या राजकीय वर्तुळात पाहायला मिळत आहे. यामध्ये आता संजय कदम यांच्याही नावाची भर पडली आहे. विशेष म्हणजे, संजय कदम आणि रामदास कदम यांच्यातील राजकीय मतभेद सर्वश्रुत आहेत. मात्र, संजय कदम यांच्या शिवसेना (शिंदे गट) प्रवेशामुळे या दोघांमधील वाद मिटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
कोकणातील राजकीय समीकरणांचा विचार करता, ठाकरे गटाकडे आता भास्कर जाधव यांच्याशिवाय कोणताही मोठा चेहरा शिल्लक राहिलेला नाही. त्यामुळे ठाकरे गटाची कोकणातील ताकद कमी होत असल्याचे बोलले जात आहे. त्याच वेळी, शिवसेना (शिंदे गट) दिवसेंदिवस मजबूत होत असून, त्यांची कोकणातील पकड अधिक वाढत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.