माळेगाव साखर कारखाना निवडणूक; अजित पवार विरुद्ध चंद्रराव तावरे थेट लढत, २४ जूला निकाल
माळेगाव सहकारी साखर कारखान्यासाठी (Malegaon factory Election) आज ( २२ जून) मतदान प्रक्रिया पार पडत आहे. सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली आहे. या निवडणुकीत एकूण चार पॅनलमध्ये लढत होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात कारखान्याचे माजी अध्यक्ष आणि सहकार महर्षी चंद्रराव तावरे निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत.
कारखान्यातील २१ जागांसाठी ९० उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आपले नशीब आजमावत आहेत. १९ हजार ५४९ सभासग आपला मतदानाच हक्क बजावणार आहेत. बारामती शहरातील प्रशासकीय भवनात मतदान होत आहेत. माळेगाव कारखान्याच्या कार्यक्षेत्रात एकूण ३७ गावांचा समावेश असून ६७ मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया होत आहे. दोन दिवसांनी म्हणजे २४ जूनला मतमोजणी होणार आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी आणि अजित पवार यांनीदेखील मतदान केल्याची माहिती समोर आली आहे.
कारखान्याची यंदाच्या पंचवार्षिक निवडणुकीला एक विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. माळेगाव निवडणुकीत पहिल्यांदाच अजित पवार आणि चंद्रराव तावरे यांच्यात थेट लढत असल्याने संपूर्ण बारामतीकरांचे या निवडणुकीकडे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत चार पॅनल आणि काही अपक्ष उमेदवारही रिंगणात उतरले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे ‘श्री नीलकंठेश्वर पॅनल’, चंद्रराव तावरे व रंजनकुमार तावरे यांचे ‘सहकार बचाव शेतकरी पॅनल’, शरद पवार गटाचे ‘बळीराजा शेतकरी सहकार बचाव पॅनल’ आणि ‘कष्टकरी शेतकरी संघर्ष समिती’ ही प्रमुख पॅनल यावेळी आमने-सामने आहेत.
शरद पवार गट व संघर्ष समितीमुळे कोणत्या पॅनलला फटका बसणार, हे निकालाच्या दिवशीच स्पष्ट होणार आहे. दरम्यान, अजित पवार यांनी स्वतः निवडणुकीच्या रिंगणात उतरूत “मीच चेअरमन होणार” अशी थेट घोषणा केल्याने राज्यभरात या निवडणुकीकडे लक्ष वेधले गेले आहे. अजित पवारांच्या विरोधात चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे यांनी जोरदार प्रचार उभा केला असून, प्रतिसाद देताना अजित पवारांना तब्बल दहा ते बारा सभा घ्याव्या लागल्या.
आज (22 जून) सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत ६७ मतदान केंद्रांवर मतदान पार पडणार आहे. एकूण ९० उमेदवार रिंगणात आहेत.
मतदान केंद्रांची विभागवार माहिती :
गट क्रमांक 1 – माळेगाव : 11 केंद्रे
गट क्रमांक 2 – पणदरे : 13 केंद्रे
गट क्रमांक 3 – सांगवी–कांबळेश्वर : 8 केंद्रे
गट क्रमांक 4 – खांडज–शिरवली : 7 केंद्रे
गट क्रमांक 5 – निरावागज : 12 केंद्रे
गट क्रमांक 6 – बारामती : 15 केंद्रे
‘ब’ वर्गासाठी स्वतंत्र केंद्र : 1
एकूण मतदान केंद्रांची संख्या : 67
जळगाव हादरलं! पाच दिवसांपासून बेपत्ता तरुणाचा मृतदेह विहिरीत सापडला;कुटुंबाचा खून झाल्याचा आरोप
बारामतीत गेल्या काही दिवसांपासून माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची चर्चा सुरू आहे. कोणता पॅनल विजयी होणार, कोण अपयशी होणार, हे मंगळवारी ( २४ जून) होणाऱ्या मतमोजणीत स्पष्ट होणार आहे.या सगळ्या घडामोडींवर खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील प्रतिक्रीया दिली आहे. “प्रत्येक निवडणूक महत्त्वाची असून ती लोकशाही पद्धतीने लढवली पाहिजे. संविधानाच्या माध्यमातून लोकशाही टिकावी, यासाठी निवडणुका घेतल्या जातात. ही सहकाराची निवडणूक आहे. दिवंगत मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे यात खूप मोठं योगदान आहे. त्यांच्या माध्यमातूनच सहकाराची चळवळ मोठी झाली. जे कोणी या निवडणुकीत लढत आहे, त्या सर्वांना शुभेच्छा, पारदर्शन निवडणूक पार पडावी, कारखाना चांगल्या पद्धतीने चालू राहावा. पण कारखाना कुठलाही असो त्यात पारदर्शक कारभार होणे ही खूप महत्त्वाची गोष्ट असते. आतापर्यंत खूप टीका टीपण्ण्या झाल्या. आज मतदान करू,” असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.