भिगवण : शेतकऱ्याने व्याजाने घेतलेल्या पैशाची परतफेड करूनही शेतकरी पिता -पुत्राला त्याच गावातील सावकारांनी शिवीगाळ व दमदाटी करून जिवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना शेटफळगडे (ता. इंदापूर) येथे घडली. याप्रकरणी भिगवण पोलिसांनी पाच सावकारांविरोधात गुन्हा दाखल केला.
ज्ञानेश्वर उर्फ माऊली विलास शिरसाट (वय ३५) वसंत ज्ञानदेव राजपुरे (वय ५०) गणेश वसंत राजपुरे (वय २४ ) रवींद्र बाळासो शिरसट (वय ३५, सर्व रा. रा. शेटफळगडे, ता. इंदापूर) व प्रताप शिवाजीराव तावरे (वय ३५ रा. माळेगाव, ता. बारामती) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या सावकारांची नावे आहेत. याप्रकरणी शेतकरी प्रवीण दिलीप मुळीक (वय ३० रा. शेटफळगडे, ता. इंदापूर) यांनी भिगवण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
भिगवणचे सहायक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, शेटफळगडे येथील शेतकरी प्रवीण दिलीप मुळीक यांनी काही दिवसापूर्वी वरील पाच आरोपींकडून पैशाची गरज असल्याने १३ लाख रुपये रक्कम साडेतीन रुपये टक्क्यांनी घेतली होती. त्यानुसार आरोपींनी मुळीक यांची वडिलोपार्जित शेतजमीन गट नंबर ४१ मधील ५५ आर गुंठे क्षेत्र व गट नंबर ५० मधील ४४ आर गुंठे क्षेत्राचे खरेदीखत करून घेतले होते.
– १३ लाख कर्जापोटी २१ लाख केले परत
मुद्दल व व्याजापोटी मुळीक यांनी २१ लाख रुपये आजपर्यत दिले होते. प्रवीण मुळीक यांना आरोपी यांनी सिक्युरिटी म्हणून ठेवलेली शेतजमिनीची मागणी केली असता फिर्यादी प्रवीण मुळीक व फिर्यादीचे वडिल यांना शिवीगाळ दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिली. पुढील तपास पोलीस हवालदार जाधव हे करीत आहेत.






