सांगली : आटपाडी परिसरातील काही क्षेत्र आज राखीव संवर्धन घोषित झाले. या निर्णयामुळे श्वान कुळातील लांडगा, तरस, कोल्हा, खोकड यांचे जतन होण्यास मदत होणार आहे.
श्वान कुळात सापडणारे चार प्राणी म्हणजेच लांडगा, तरस, कोल्हा आणि खोकड. या चार प्राण्यांचे अस्तित्व या आटपाडी संवर्धन राखीव क्षेत्रात प्रामुख्याने दिसून येत होते. नव्याने घोषित झालेले आटपाडी संवर्धन राखीव याचे क्षेत्र ९.४८ स्क्वेअर किलोमीटर असणार आहे. राखीव संवर्धन घोषित व्हावे व या प्राण्यांचे संरक्षण व्हावे. यासाठी पापा पाटील, पश्चिम वन्यजीव विभागाचे अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक डॉ. क्लेमेंट बेन यांनी खूप प्रयत्न केले होते. या संवर्धन राखीवमुळे गवताळ डोंगराळ प्रदेश असलेल्या आटपाडी भागातील निसर्गाचे संवर्धन होण्यास मदत होणार आहे. प्रस्तावित आटपाडी संवर्धन राखीव क्षेत्र हे पश्चिमेकडील मायणी संवर्धन क्षेत्राला ईशान्येकडील माळढोक पक्षी अभयारण्याशी जोडते. यामुळे वन्यजीव भ्रमणमार्गाचे संरक्षण होण्यास मदत होणार आहे. या परिसरामध्ये तीन प्रकारचे वनाच्छादन दिसून येते. उदा. अर्ध-सदाहरित, आर्द्र पानझडी व शुष्क पानझडी. या परिसरामध्ये ३६ वृक्ष प्रजाती, ११६ हर्ब प्रजाती, १५ झुडपी प्रजाती, १४ वेल प्रजाती व १ परजीवी वनस्पती आढळून येते.
डॉ. व्ही. क्लेमेंट बेन यांच्या विचारातून व पुढाकाराने हा प्रस्ताव सांगली वन विभागातर्फे शासनाकडे सादर करण्यात आला होता. प्रस्तावासाठी सांगली जिल्ह्यातील वन अधिकारी व कर्मचारी, माजी मानद वन्यजीव रक्षक अजित पाटील (पापा) व आटपाडी गावातील नागरिक, आमदार अनिल बाबर यांनी शासनाकडे मागणी करून सतत पाठपुरावा केला होता.
पूर्व भागात ९.४८ चौ. किमी वनजमीन
सांगली जिल्ह्याच्या पूर्व भागातील ९.४८ चौ. किमी वनजमीन नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या लांडगा या वन्यप्राण्यांसाठी व इतर वन्य प्राण्यांसाठी राखीव ठेवण्यात आली आहे.
या प्राण्यांचा आहे अधिवास
या परिसरामध्ये लांडगा, कोल्हा, तरस, ससा इ. वन्यजीव आढळून येतात. आटपाडी संवर्धन राखीव क्षेत्र हे या परिसरातील लांडगे, तरस, कोल्हे, ससे आणि इतर सस्तन प्राण्यांच्या अधिवासाचे संवर्धन करण्यास मदत करेल.