पुणे-सोलापूर रस्त्याच्या चौपदरी कामांना लवकरच होणार सुरुवात (फोटो - सोशल मीडिया)
गडहिंग्लज : गडहिंग्लज शहरातील रिंग रोडच्या सुधारित आराखड्यातील पंधरा मीटर रुंदीच्या वळण रस्त्यासाठी १२२.५१ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध व्हावा, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या अभियंता सेलचे कोल्हापूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष अभियंता चंद्रकांत सावंत यांनी खासदार धनंजय महाडिक यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
गडहिंग्लज शहरात सद्यस्थितीत एकूण सहा रिंग रोड पैकी अंशतः रिंग रोडचे भाग संपादित आहेत. परंतु पूर्ण लांबीच्या रिंग रोड पैकी खासगी मालकीच्या जागा नगरपरिषदेची आर्थिक स्थिती बेताची असल्याने संपादित झालेल्या नाहीत. रिंग रोड साठी संपादन करावयाच्या खासगी जागेच्या मिळकतदारांना मोबदला अदा करणे आवश्यक आहे. या रिंग रोडच्या भूसंपादन, फुटपाथ गटारसह बांधकाम करणे, विद्युत पोल शिफ्ट व विद्युतकरण करणे या कामांसाठी अंदाजे १२२.५१ कोटी इतक्या निधीची गरज आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे आपल्या माध्यमातून पाठपुरावा होऊन निधी मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न व्हावेत, अशी विनंती निवेदनात अभियंता सावंत यांनी केली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
शहरात वाहतूक काेंडी भेडसावणार
या संदर्भात माहिती देताना अभियंता चंद्रकांत सावंत म्हणाले, गडहिंग्लज शहरातून नुकताच राष्ट्रीय महामार्ग गेला आहे. त्यामुळे अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. भविष्यात शक्तीपीठ महामार्ग देखील याच महामार्गावरून नेण्याचे शासनाचे धोरण आहे. परिणामी गडहिंग्लज शहरात प्रचंड वाहतूक वाढणार आहे. त्यामुळे गडहिंग्लज शहरात रिंग रोड लवकरात लवकर कार्यान्वित होणे फारच गरजेचे आहे. भविष्यातील ही समस्या लक्षात घेऊन रिंगरोड साठी निधी उपलब्ध होण्यासाठी खासदार महाडिक यांचे निवेदनातून लक्ष वेधण्यात आले आहे. त्यांच्या शिफारशीने केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नातून निधी मंजुरीसाठी पाठपुरावा केला जात असल्याचे अभियंता चंद्रकांत सावंत यांनी सांगितले.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
तुकड्या तुकड्याने रस्त्याचे काम
१९६७ साली गडहिंग्लज शहराचा पहिला विकास आराखडा तयार झाला. १९८३ ला त्याला अंतिम मंजुरी मिळाली. तेव्हापासून हा रिंग रोड आहे. त्यानंतर पुन्हा २०१५ व २०१८ साली दुसरा सुधारित विकास आराखडा तयार करण्यात आला. या रिंग रोडची एकूण लांबी साडेसात किलोमीटर इतकी आहे. पैकी अडीच किलोमीटर भूसंपादन झाले आहे. तुकड्या तुकड्याने झाल्याने हा रिंग रोड कार्यान्वित झालेला नाही, असे अभियंता सावंत यांनी निवेदनात म्हटले अाहे.






