मेढा : सह्याद्रीच्या कडेकपारी डोंगररांगा म्हणजे निसर्गाचा खजानाच आणि यात कास परिसर म्हटले की निसर्गाची वेगळी पर्वणीच. येथे कोणत्याही मौसमात आले तरी निसर्गाचा वेगवेगळा आविष्कार अनुभवायास मिळतो. आता पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी पर्यटक कास परिसरात दाखल होऊ लागले असून, ओले चिंब होत निसर्गाचा मनमुराद आनंद लुटत आहेत.
पावसाळ्यात अतिपर्जन्यवृष्टीचा भाग म्हणून कास, बामणोली, जुंगटी, भांबवली, एकीव, केळवली, परिसराची ओळख असून येथील दाट धुके, मुसळधार पाऊस, सोसाट्याचा वारा, छोटे मोठे धबधबे, कास तलावातील पाणी, खळखळणारे ओढे, घनदाट झाडी, हिरव्यागार डोंगररांगा पर्यटकांच्या खास आकर्षण ठरत आहेत.
याच्यासोबत गरमगरम भजी, चहा हवाच!
गेल्या आठदहा दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसाने परिसर पुरता न्हाऊन गेला असून सुट्टीच्या दिवशी पर्यटकांची ओसंडून वाहणाऱ्या एकीव धबधबा, केळवली धबधबा, कास पठार, कास तलाव व भांबवली परिसरात वर्दळ पहायला मिळत आहे. काही हौशी पर्यटक पावसात भिजण्याचा मनमुराद आनंद लुटत धबधबे व खळखळणाऱ्या ओढयावर फोटोशेसन करताना दिसत आहेत. त्यातच हॉटेलमध्ये गरमागरम भजी, वडापाव, कणीस, चहा, शेगांचा आस्वाद घेत आहेत.