या रुग्णवाहिकेवर एक वैद्यकीय अधिकारी, एक चालक आणि एक सहायक अशी तिघांची नियुक्ती असून, त्यांच्या वेतनासाठी शासन दरमहा लाखो रुपयांचा खर्च करते. याशिवाय इंधन, देखभाल, औषधसाठा आणि अत्यावश्यक उपकरणांसाठीही मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला जातो. म्हणजेच एका रुग्णवाहिकेमागे दरमहा मोठा खर्च होऊनही प्रत्यक्ष सेवा मात्र शून्य असल्याचे चित्र आहे.जिल्ह्यात एकूण 15 रुग्णवाहिका कार्यरत असल्याचे सांगितले जाते; मात्र या सेवेचा लाभ रुग्णांना वेळेवर मिळत नसल्याने नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. 108 वर फोन केल्यास कॉल उचलला जात नाही, आणि उचलला तरी रुग्णवाहिका वेळेत पोहोचत नसल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत आहेत. अनेक वेळा रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचते तेव्हा रुग्णाला आधीच खासगी वाहनाने हलविण्यात आलेले असते.
या विलंबामुळे रुग्णांच्या जीवावर बेतणाऱ्या घटना घडत असून, नागरिकांना खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे एकीकडे शासनाकडून रुग्णवाहिकांवर लाखोंचा खर्च होत असताना, दुसरीकडे रुग्णांना स्वतःच्या खिशातून खर्च करावा लागत असल्याने ‘दुहेरी आर्थिक फटका’ बसत आहे.या सर्व प्रकाराकडे प्रशासनाने जाणीवपूर्वक डोळेझाक केल्याचा आरोप होत असून, जबाबदार अधिकाऱ्यांनी तत्काळ लक्ष घालून संबंधित यंत्रणेला वठणीवर आणावे, अशी जोरदार मागणी होत आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश हरिदास यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे.दरम्यान, “रुग्णवाहिका सेवा रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी आहे की केवळ यंत्रणा जिवंत ठेवण्यासाठी?” असा सवाल उपस्थित करत नागरिकांनी प्रशासनाला जाब विचारण्यास सुरुवात केली आहे.






