फोटो सौजन्य: Pinterest
चीनमधील इलेक्ट्रिक कार निर्माता कंपनी BYD ने Auto China 2026 मध्ये आपल्या नव्या जनरेशनची BYD Atto 3 सादर केली आहे. या अपडेटेड मॉडेलमध्ये अनेक महत्त्वाचे बदल करण्यात आले असून, ही SUV आधीपेक्षा अधिक पॉवरफुल, अधिक प्रशस्त आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत अधिक प्रगत बनली आहे.
या नव्या Atto 3 ची सर्वात मोठी खासियत म्हणजे तिची जबरदस्त रेंज आणि चार्जिंग टेक्नोलॉजी. ही इलेक्ट्रिक SUV एकदा फुल चार्ज केल्यावर सुमारे 630 किमीपर्यंत धावू शकते. यामध्ये कंपनीची नवीन फ्लॅश चार्जिंग टेक्नोलॉजी देण्यात आली आहे, ज्यामुळे या कारची बॅटरी केवळ 9 मिनिटांत 10% ते 97% पर्यंत चार्ज होऊ शकते.
E-Scooter अचानक कमी रेंज देतेय? ‘हे’ गोल्डन रुल्स आणि बॅटरी लाईफ वाढलीच म्हणून समजा
या SUV च्या साइजमध्येही वाढ करण्यात आली आहे. ही कार आता अधिक लांब, रुंद आणि उंच झाली असून तिचा रोड प्रेझेन्स अधिक मजबूत झाला आहे. व्हीलबेस वाढवल्यामुळे केबिनमध्ये अधिक जागा मिळते आणि प्रवाशांना अधिक आरामदायी अनुभव मिळतो.
स्पेसच्या बाबतीत, या कारमध्ये सुमारे 750 लिटरचा मोठा बूट स्पेस देण्यात आला आहे. याशिवाय बोनटखाली जवळपास 180 लिटरचे अतिरिक्त स्टोरेज (फ्रंक) देण्यात आले आहे, ज्यामुळे ही SUV अधिक प्रॅक्टिकल ठरते.
नव्या Atto 3 मध्ये प्रीमियम इंटीरियर आणि आधुनिक फीचर्स देण्यात आले आहेत. यात मोठा टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, अॅम्बिएंट लाइटिंग, वायरलेस चार्जिंग, प्रीमियम साउंड सिस्टम आणि अनेक अॅडव्हान्स ड्रायव्हर असिस्ट फीचर्सचा समावेश आहे. काही व्हेरिएंट्समध्ये LiDAR आधारित ऑटोमॅटिक ड्रायव्हिंग टेक्नोलॉजी देखील दिली जाऊ शकते.
परफॉर्मन्सच्या बाबतीतही ही SUV दमदार आहे. यात नवीन जनरेशनची Blade बॅटरी टेक्नोलॉजी देण्यात आली आहे, जी अधिक सुरक्षित, टिकाऊ आणि उच्च ऊर्जा घनता (energy density) देणारी मानली जाते.
भारतात या कारच्या लाँचबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र, Atto 3 आधीपासूनच भारतात लोकप्रिय असल्यामुळे भविष्यात ही नवीन जनरेशन भारतीय बाजारातही येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
एकूणच, नवीन BYD Atto 3 ही लांब रेंज, अत्यंत जलद चार्जिंग, प्रशस्त स्पेस आणि प्रगत तंत्रज्ञान यांचा उत्तम संगम आहे. भविष्यातील इलेक्ट्रिक कार्स केवळ पर्यावरणपूरकच नाहीत, तर अधिक शक्तिशाली आणि सोयीस्करही असतील, हे या SUV मधून स्पष्ट होते.






