फोटो - सोशल मीडिया
मुंबई : मागील काही दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे हा विषय चर्चेत आहे. राजकोटमध्ये घडलेल्या दुर्घटनेवरुन विरोधक आक्रमक झाले आहेत. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सूरत मोहिमेबाबत वक्तव्य केले. यावरुन पुन्हा एकदा विरोधकांनी टीकास्त्र डागले होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी सूरत लुटली हे कॉंग्रेसने शिकवलं आहे. शिवरायांनी सूरत लुटली नव्हती, या आशयाचे विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. त्यामुळे जोरदार राजकारण रंगल्यानंतर आता फडणवीस यांनी या प्रकरणावर स्पष्टीकरण दिले आहे.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
एका वृत्तवाहिनीने आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजकोट किल्ल्यावर झालेल्या दुर्घटनेवर प्रतिक्रिया दिली. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराज हे मराठी माणूस, महाराष्ट्र आणि तमाम हिंदू समाजाचं अराध्य दैवत आहेत. ज्यावेळी आपल्या दैवताची मूर्ती भंगते त्यावेळी जेवढं दुःख होतं तेवढंच दुःख महाराष्ट्रातल्या जनतेला आणि शिवप्रेमींना राजकोटचा पुतळा पडल्याने झालं. यातला विषय इतकाच आहे की ज्या प्रकारे राजकारण करण्यात आलं ते दुर्दैवी आहे. पुतळ्या पडल्यानंतर फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्यात आले. मी विरोधी पक्षाकडे पाहतो तेव्हा त्यांना दुःख किती झालं आणि राजकीय संधी किती साधली हा प्रश्न पडला. मला त्यात राजकीय संधीच दिसली.”
महाराजांनी कधीही सूरत लुटली नव्हती
फडणवीस यांनी सूरत लूट या संदर्भात केलेल्या विधानावर देखील स्पष्टीकरण दिले. तसेच यावरुन त्यांनी कॉंग्रेस पक्षाला देखील धारेवर धरले. फडणवीस म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराजांनी सूरत लुटली हे म्हणणं चुकीचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सूरतेवर दोनदा स्वारी केली. अल्लाउद्दीन खिलजी जे करतो त्याला लुटली म्हणतात, अब्दाली, तैमूर लंग यांनी जे केलं त्याला लूट म्हणतात. महाराजांनी तिथल्या सामान्य माणसांना हात तरी लावला का? शिव इतिहासकारांनी माध्यमांना सांगितलं की महाराजांनी पत्र दिलं होतं मुघलांचा खजिना आहे, तुम्ही तीन वर्षे युद्ध चालवलं, त्यासाठी इतका खर्च आला. तुम्ही हा खर्च द्या अन्यथा मी स्वारी करेन. शिवरायांनी एक प्रकारे त्यांना नोटीसच पाठवली होती. खजिना वसूल केला, त्यानंतर महाराजांनी पावती दिली. याला लूट म्हणतात? आपल्या बापाला लुटारु म्हणणारे हे कोण लोक आहेत? महाराजांनी कधीही सूरत लुटली नव्हती. हे तेच लोक आहेत जे सांगत आलेत 1857 ची लढाई स्वातंत्र्यसमर नव्हतं तर शिपायांचं बंड होतं. कशाचं शिपायांचं बंड? ती पण स्वातंत्र्याची लढाईच होती. तर महाराजांनी स्वराज्यासाठी सूरतवर स्वारी केली. महाराजांना लुटारु म्हणणं चुकीचं आहे,” असे स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस यांनी दिले.