मुंबई – काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांना चांगलेच सुनावल्याचे समोर आले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, राज्य सरकारच्या काही महत्त्वाच्या निर्णयांबाबत परस्पर जाहीर वक्तव्य केल्यामुळे उपमुख्यमंत्री फडणवीस संतापले.
तसेच, यापुढे कोणताही निर्णय परस्पर जाहीर करू नका, अशी सक्त ताकीद फडणवीसांनी अब्दुल सत्तार यांच्यासह उतावीळ मंत्र्यांना दिली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या मंत्र्यांना समज दिल्याची माहिती आहे.
केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेच्या धर्तीवर राज्यातही नवीन सन्मान योजना राबवण्याबाबत राज्य सरकार विचार करत आहे. याबाबत शिंदे- फडणवीस अधिकाऱ्यांशी चर्चा करीत असतानाच ही माहिती प्रसारमाध्यमांमध्ये फुटली. त्यामुळे सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या गोष्टीची गंभीर दखल घेतली. मंत्रिमंडळ बैठकीतच फडणवीसांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांना धारेवर धरत ही माहिती फोडल्याबद्दल जाब विचारला.