अंबाबाईच्या मूळ मूर्तीचं दर्शन आता भाविकांना घेता येणार; जिल्हाधिकारी येडगे यांची माहिती
कोल्हापूर : महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात देवीच्या मूळ मूर्तीवर गेल्या दोन दिवसांपासून रासायनिक संवर्धन प्रक्रिया सुरू होती. मूळ मूर्तीवरील संवर्धन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज मूर्तीच्या आजूबाजूला असलेल्या इतर भागाची पाहणी करून आवश्यक बदल केले आहेत. त्यामुळे आज देखील अंबाबाई मंदिराच्या गाभाऱ्यात रासायनिक संवर्धनाची प्रक्रिया करण्यात आली.
जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज या रासायनिक संवर्धन प्रक्रियेची पाहणी केली. दरम्यान, आज ही सगळी संवर्धन प्रक्रिया पूर्ण केली जाणार असून, उद्यापासून अंबाबाईच्या मूळ मूर्तीचं दर्शन भाविकांना घेता येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. केंद्रीय पुरातत्त्व विभाग आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीनं गेल्या दोन दिवसांपासून करवीर निवासिनी अंबाबाईच्या मूळ मूर्तीवर संवर्धनाची प्रक्रिया सुरू होती. नवी दिल्ली येथून आलेल्या या पथकामध्ये उपअधीक्षक डॉ. विनोद कुमार, निलेश महाजन, सुधीर वाघ, मनोज सोनवणे या तज्ज्ञांचा समावेश आहे.
सोमवारी (दि.११) रोजी मूर्तीवर गाभाऱ्यातील आद्रतामुळे पडलेले पांढरे चट्टे भिंगाच्या सहाय्याने पाहणी करुन यावर संवर्धनाची प्रक्रिया करण्यात आली. आज झालेल्या संवर्धनाच्या कामाची जिल्हाधिकारी अमोल शेडगे यांच्यासह पुरातत्व विभागाच्या तज्ज्ञ पथकानं पाहणी केली. संवर्धनानंतर मूर्तीच्या चेहऱ्यावरील बारकावे स्पष्ट दिसत असून, उत्सव मूर्तीचे सौंदर्य अधिक खुलणार आहे. या प्रक्रियेसाठी अंबाबाई मंदिरातील मुख्य गाभारा प्रशासनाकडून दोन दिवस बंद ठेवण्यात आला होता. त्यामुळे मूळ मूर्तीच्या दर्शनाऐवजी उत्सवमूर्ती व देवीतत्व कलश पेटी चौकात प्रतिष्ठापित करण्यात आली. संवर्धनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यामुळे अंबाबाई देवीचे दर्शन भाविकांसाठी खुलं होणार आहे.
‘दोन दिवस संवर्धनाची प्रक्रिया सुरू असल्यामुळे देश आणि राज्यभरातून येणाऱ्या भाविकांसाठी अंबाबाईचं दर्शन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीनं बंद ठेवण्यात आलं होते. आता संवर्धनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उद्यापासून करवीर निवासिनी आई अंबाबाई देवीचं दर्शन सर्वांसाठी खुलं राहणार आहे. स्वातंत्र्यदिन आणि येणाऱ्या सलग सुट्ट्यांमुळं कोल्हापुरात भाविकांची मोठी गर्दी होणार आहे. याचं सर्व नियंत्रण देवस्थान समितीच्या वतीनं करण्यात येईल’, अशी माहिती सचिव शिवराज नायकवडे यांनी दिली.