धनंजय मुंडेंनी घेतली अजित पवारांची भेट; राजीनामा देण्याच्या मागणीदरम्यान पडद्यामागे दोन तास चर्चा
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरू राज्याचं राजकीय वातावरण तापलं आहे. या प्रकरणावरून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. त्यातचं आज धनंजय मुंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली असून तब्बल दोन तास पडद्यामागे चर्चा झाली आहे. याबाबत धनंजय मुडे यांनी मात्र माध्यमांसमोर कोणतीही माहिती दिली नाही. नववर्षाच्या अजित पवारांनी शुभेच्छा दिल्याचं त्यांनी सांगितलं.
सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी राज्यातील वातावरण ढवळून निघालं आहे. या प्रकरणामुळे धनंजय मुंडे अडचणीत सापडले असून त्यांचे कथित साथीदार वाल्मिक कराड यांची सीआयडी चौकशी सुरू आहे. या प्रकरणी सातत्याने नवनवे खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणातील आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. तर दुसरीकडे राज्यात मंत्रिमंडळ विस्तार होऊन तीन आठवडे उलटले तरी पालकमंत्री ठरलेले नाहीत. तिन्ही पक्षांतील अंतर्गत रस्सीखेचमुळे पालकंत्रीपदावर शिक्कामोर्तब होत नसल्याचं समजतं. या संपूर्ण पार्श्वभूमीवर आज धनंजय मुंडे यांनी अजित पवार यांची भेट घेतली आहे.
बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात भाजप आमदार सुरेश धस पहिल्या दिवसापासून मंत्री धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप करत आहेत. या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड, सुदर्शन घुले, सुधीर सांगळेला अटक कऱण्यात आली. यानंतर या प्रकरणाचा सीआयडी तपास अद्यापही सुरूच आहे. पण अटकेनंतही वाल्मिक कराडचे नवनवे प्रताप कारनामे समोर येतच आहेत. बीड आणि परभणीनंतर काल पुण्यात जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात आमदार सुरेश धस यांनी पुन्हा एकदा वाल्मिक कराडची पोलखोल केली आहे.
गेल्या वर्षी 14 जूनला अवादा कंपनीचे अधिकारी आणि वाल्मिक कराड, नितीन बिक्कड यांची बैठक झाली होती. ही बैठक थेट धनंजय मुंडे यांच्या परळीतील बंगल्यावर बैठक झाली. या बैठकीनंतर अवादा कंपनीच्या शुक्ला नावाचा अधिकारी धनंजय मुंडे यांची भेट घेण्यासाठी मुंडे यांचे स्वीय सहाय्यक प्रशांत जोशी यांच्याकडे प्रयत्न करत होते. पण धनंजय मुंडेची भेट घेण्यासाठी वाल्मिक कराडचा इगो दुखावला गेला. त्यामुळे त्याने प्रशांत जोशी यांना खडसावल्याचे सुरेश धस यांनी सांगितलं.
सरपंच संतोष देशमुख प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक झाले आहेत. सर्वपक्षीय शिष्टमंडळानं राज्यपालांची भेट घेत धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. माजी खासदार संभाजीराजे, विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, खासदार बजरंग सोनावणे, आष्टीचे भाजपाचे आमदार (भाजप) सुरेश धस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार संदीप क्षीरसागर आणि ज्योती मेटे यांनी राज्यपालांची भेट घेतली. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपींवर कठोर कारवाई व्हावी, यासाठी आज सर्वपक्षीय शिष्टमंडळानं राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. बीडमध्ये खंडणी, अपहरण आणि इतर गुन्ह्यांचे प्रमाण वाढलं आहे. सरपंच संतोष देशमुख प्रकरण हे बीडमधील बिघडलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेचे उदाहरण असल्याचे शिष्टमंडळानं राज्यपालांना सांगितलं. पोलिसांच्या कथित निष्काळजीपणा आणि पक्षपातीपणामुळे बीड जिल्ह्यात अशांतता पसरली आहे. राज्यभरातील सार्वजनिक सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाला आहे, असे शिष्टमंडळानं म्हटले आहे.