राजगुरुनगर : मराठा समजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) हे आक्रमक झाले आहेत. त्यांनी उपोषण देखील सुरु केले होते. महिनाभरात आरक्षणावर निर्णय घेण्यात येईल, असे राज्य सरकारने आश्वासन दिल्यानंतर जरांगे पाटील यांनी बेमुदत उपोषण सोडले होते. पण आता पुन्हा त्यांनी इशारा दिला. ‘मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) द्यावं ही आमची एकच मागणी आहे. आमच्या संयमाचा अंत पाहू नका’, असे म्हणत त्यांनी सरकारला इशारा दिला.
राजगुरुनगर येथे जरांगे-पाटील यांची सभा झाली. यावेळी त्यांनी मराठा आरक्षण मिळावे, यासाठी आग्रही मागणी केली. ते म्हणाले, ‘मराठा समाजाला आरक्षण द्यायचं ही आमची एकच मागणी आहे. आमच्या संयमाचा अंत पाहू नका. ही संधी मराठा समाजाला पुन्हा येणार नाही. मी जेव्हा उपोषण केलं तेव्हा ते सोडावं म्हणून अनेक प्रयत्न केले गेले. त्यांनी मराठा बांधवांना सांगितले की, आत्महत्या करायची नाही. उद्रेक करायचा नाही. सरकारच्या भूमिकेमुळे मराठा तरूणांचे बळी जात आहेत. त्यामुळे आता असं आंदोलन करू की ते झेपणार नाही, असे म्हणत 24 ऑक्टोबरला आम्ही काय करणार हे 22 ऑक्टोबरला सांगणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
उद्यापासून कामाला लागा
आरक्षणाच्या मुद्यावरून मराठा समाज आक्रमक झाला आहे. त्यात जरांगे-पाटील यांनी उद्यापासून कामाला लागा, आरक्षण काय ते समजून सांगा. घराघरात जाऊन माहिती द्या. मराठा समाजाला अद्याप आरक्षण नाही. मग सरकारची समिती नेमकं काय करते? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.