सोलापूर : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांचे प्रशासनावर लक्ष आहे का? याबाबत मला हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी करावी लागेल, अशा शब्दात आमदार अमोल मिटकरी यांनी शनिवारी येथे नाराजी व्यक्त केली.
जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागातील लिपिक संजय बाणूर यांची बदली करावी, या मागणीसाठी लोकशासन आंदोलन पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजू दिंडोरे, मारुती जाधव हे कार्यकर्त्यांसह गेल्या २२ दिवसांपासून जिल्हा परिषदेसमोर उपोषणाला बसले आहेत. या उपोषणकर्त्यांना आमदार अमोल मिटकरी यांनी भेट देऊन चौकशी केली. लोकशासन आंदोलन पार्टीचे जिल्हाध्यक्ष दिंडोरे यांनी उपोषण करण्याचे कारण स्पष्ट केले.
प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना लाच घेताना पकडण्यात आले. त्यामुळे एकाच टेबलावर ठाण मांडणाऱ्या २० कर्मचाऱ्यांची सीईओ स्वामी यांनी बदली केली. यामध्ये माध्यमिक शिक्षण विभागातील वरिष्ठ लिपिक बाणूर यांचीही बदली होणे अपेक्षित होते. त्यांच्यावर यापूर्वी लाचलुचपतची कारवाई झाली होती. त्यातून ते निर्दोष सुटल्यानंतर त्यांना दुसरीकडे पदस्थापना देणे अपेक्षित होते. पण पुन्हा शिक्षण विभागातच त्यांना नियुक्ती देण्यात आली. त्यामुळे बेकायदेशीरपणे बाणूर यांनी मिळविलेल्या नियुक्तीला विरोध करीत त्यांचीही बदली करा अन्यथा या २० कर्मचाऱ्यांची बदली रद्द करा या मागणीसाठी हे उपोषण सुरू असल्याचे त्यांनी निदर्शनाला आणले.
सीईओ स्वामी यांनी बदली केलेले बरेच कर्मचारी अजून आहे त्याच टेबलावर आहेत. त्यामुळे याबाबत सीईओ स्वामी यांना वेळोवेळी निवेदन दिली. पण या आठवड्यात तर ते जिल्हा परिषदेत आलेच नाहीत. बाणूर यांच्या कार्यपद्धतीबाबत माहिती घ्या, धक्कादायक माहिती मिळेल. जिल्ह्यातील ३०० शिक्षक व कर्मचारी संघटनानी आमच्या उपोषणाला पाठिंबा दिला आहे, असे सांगत त्यांनी वर्तमानपत्रात आलेल्या बातम्या व निवेदने त्यांना दाखवली. त्यामुळे न्याय मिळेपर्यंत आमचे उपोषण सुरूच असणार असल्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.
मिटकरी यांनी केला संपर्क…
आमदार अमोल मिटकरी यांनी दिंडोरे यांची कैफियत ऐकून घेऊन सीईओ स्वामी यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचा संपर्क झाला नाही. त्यावर आमदार मिटकरी यांनी सीईओ स्वामी यांचं प्रशासनावर लक्ष नाही असे दिसत आहे. त्यामुळे हा प्रश्न या प्रश्नावर हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी केली जाईल, असा इशारा दिला. पूनम गेटवर आंदोलनास बसलेल्या आंदोलनकर्त्यांचे प्रश्न समजावून घेऊन, निवेदने स्वीकारून ते निघून गेले.