कल्याण : कल्याण पूर्व येथील पालिकेच्या ड प्रभाग कार्यालयाच्या आवारात उभारण्यात आलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भव्य स्मारकात रात्री बारा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. यावेळी हजारो नागरिक, अनुयायांसह खासदार डॉ श्रीकांत शिंदे देखील उपस्थित होते . यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांनी जमलेल्या समुदायाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना खासदार श्रीकांत शिंदे यांनी कल्याण पूर्व येथील लाखो नागरिकांची कल्याण पूर्वेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भव्य स्मारक व्हावे अशी मागणी केली होती. येथील अनुयायी जनता गेल्या अनेक वर्षांपासून त्याची वाट पाहत होती.
कल्याण पूर्वेत आता भव्य स्मारक उभारण्यात आले तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य पूर्णाकृती पुतळा ही उभारण्यात आला आहे. कल्याण पूर्व येथील जनतेला आज या ठिकाणी जयंती साजरी करता येते याचे मला समाधान आहे. लवकरच स्मारकाचे काम पूर्ण होईल व स्मारकामधील नॉलेज सेंटरच्या माध्यमातून हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संघर्षामय आयुष्याची माहिती विद्यार्थी तरुण नागरिकांना मिळणार आहे. ठाणे जिल्ह्यातील हे पहिले भव्य स्मारक असल्याचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. यावेळी संगीतमय कार्यक्रमाचा दरम्यान खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी गाणे देखील गायलं.
भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी डोंबिवलीच्या इंदिरा चौकात बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत वंदन केले. याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, शहरप्रमुख राजेश मोरे उपस्थित होते.
डोंबिवलीतील पार्श्वभक्ती श्वेतांबर मूर्तीपूजक संघाच्या वतीने दीक्षा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प. पु. अरिजितशेखर सुरीश्वरजी महाराज साहेब यांच्या आशीर्वादाने चार जणांनी दीक्षा घेतली. जैन समाजात त्यागाची मोठी भावना आहे. राजसत्तेला धर्मसत्तेची साथ असल्यामुळेच आज आपण काम करू शकत आहोत, असे मत यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केले. याप्रसंगी प. पु. कृपाशेखर महाराज साहेब, पार्श्वभक्ती श्वेतांबर मूर्तीपूजक संघाचे जयेश दोषी, इशांत शहा, भावेश शहा, शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, शहरप्रमुख राजेश मोरे यांच्यासह शेकडो जैन बांधव उपस्थित होते.