मुसळधार पावसाचा शेतीपिकांना मोठा फटका; कांदा-टोमॅटोच्या दरावर परिणाम(सौजन्य : iStock)
पुणे : जिल्ह्यात झालेल्या पावसाचा परिणाम पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घाऊक बाजारात जाणवला. कांदा आणि टोमॅटोची आवक घटली आहे. पावसामुळे प्रत खराब झाल्याने त्यांच्या भावांत घट झाली असून, चांगल्या प्रतिच्या मालाची कमतरता आहे. त्याला भाव मिळू लागल्याचे दिसून येत आहे.
पुणे जिल्ह्यात जुन्नर, खेड, आंबेगाव, शिरूरसह अहिल्यानगर येथील पारनेर, संगमनेर तालुक्यांमध्ये उन्हाळी टोमॅटोची मोठी लागवड होत असते. तसेच कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर पुणे जिल्ह्यात घेतले जाते. मात्र, यावर्षी मे महिन्यातच ऐन काढणीच्या अवस्थेतच गेली १५ दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे टोमॅटोच्या शेतात पाणी साठून राहिल्याने मूळकुज सुरू झाली आणि पिकांची वाढ खुंटली आहे. तर टोमॅटोला क्रॅक जाऊ लागले. झाडांवर करप्याचा प्रादुर्भाव झाल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
सध्या टोमॅटोला २० किलोच्या क्रेटला ५०० ते ६०० रुपये दर मिळत होते. मात्र, आता भिजलेल्या आणि क्रॅक झालेल्या टोमॅटोचे दर १०० ते ३०० रुपयांवर आले आहेत. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीसह जिल्ह्यातील इतर बाजार समिती आणि उपबाजारातील टोमेटोची आवक घटली आहे. पाऊस सुरु राहिला तर नुकसानीचा आकडा वाढू शकतो.
दरम्यान, उन्हाळी कांद्याच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. शेतकऱ्यांनी काढून ठेवलेला कांदा भिजला आहे. तसेच सुरक्षित ठिकाणी ठेवलेल्या कांद्याची वाहतूक शेतातील चिखलामुळे करता येत नाही. यामुळे कांद्याची बाजारातील आवक कमी झाल्याचे व्यापारी रितेश पोमण यांनी सांगितले.
…तर पुढील काळात आवक वाढून भाव होतील पूर्ववत
दोन-तीन दिवसांपूर्वी बाजारात ४० ते ५० ट्रक इतकी कांद्याची आवक होत होती. परंतु, आता ती २० ते २५ ट्रक इतकीच होत आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे घाऊक बाजारात कांद्याच्या भावांत प्रति किलो मागे दोन रुपयांनी वाढ झाली. पावसाने विश्रांती घेतली तर पुढील काळात आवक वाढून भाव पूर्ववत होतील असे पोमण यांनी नमूद केले.