खंडाळा बसस्थानकात अपघात(संग्रहित फोटो)
नंदुरबार : शहादा-प्रकाशा रस्त्यावरील अंकलेश्वर-बऱ्हाणपूर महामार्गावर शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास एक अपघात झाला. भरधाव डंपर आणि कार या दोन्ही वाहनांमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात डंपरने दिलेल्या धडकेत कार थेट रस्त्याच्या बाजूला शेतात जाऊन पलटी झाली. दरम्यान, अपघातात कारमधील एकाचा जागीच मृत्यू झाला आहे.
शहादा-प्रकाशा रस्त्यावरील अंकलेश्वर बऱ्हाणपूर महामार्गावरील करजई टोलनाक्याजवळ हा भीषण अपघात झाला. या अपघातात शहादा येथील रहिवासी असलेले हरजीत सिंग राजपाल (वय ६०) यांचा मृत्यू झाला आहे. हरजीत हे सकाळी कामानिमित्ताने शहादा येथून बाहेर जाण्यासाठी कारने निघाले होते. कारने महामार्गावरून जात असताना करजई टोलनाक्याजवळ वाळू डंपरशी समोरासमोर धडक झाली. या धडकेत कार शेतात जाऊन कोसळली. वाळूने भरलेल्या डंपरची धडक इतकी जोरात होती की, धडकेनंतर कार रस्त्याच्या खाली दूर अंतरावर जाऊन शेतात कोसळली. यात कारच्या समोरील भागाचा चक्काचूर झाला.
या अपघातात हरजीत सिंग यांचा जागीच मृत्यू झाला. अपघात घडल्यानंतर शेतशिवारात काम करणाऱ्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. हरजीत सिंग राजपाल हे स्थानिक पातळीवर ओळखले जाणारे व्यक्तिमत्त्व असल्याने सर्वांचे परिचित होते. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे. या अपघातामुळे परिसरात काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. डंपर चालकाविरुद्ध योग्य ती कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात आली.
मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर अपघात
खोपोलीजवळील मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर काही दिवसांपूर्वीच एक भीषण अपघात झाला. किलोमीटर 37 जवळ खोपोली फूड मॉलच्या अलीकडे मुंबई लेनवर एका बेकाबू ट्रेलरने सात वाहनांना जोरदार धडक दिली. या विचित्र अपघातात दोन महिलांचा मृत्यू झाला असून, सहा जण गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये 35 वर्षीय अश्विनी अक्षय हळदणकर आणि 17 वर्षीय श्रीया संतोष अवताडे यांचा समावेश आहे. त्यानंतर आता पुन्हा एकदा नंदूरबारमध्ये अपघात झाला आहे.






