पर्यावरण पूरक पत्रावळ्यांचा व्यवसाय प्लास्टिकच्या पत्रावळ्यांमुळे धोक्यात, व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ
भरत रांजणकर, अलिबाग: अलिबाग प्रत्येक गोष्टीत झालेले प्लास्टिकचे आक्रमण हे सर्व प्राणीमात्रांच्या अक्षरशः जीवावर आले आहे. आज बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या प्रत्येक वस्तू ह्या प्लास्टिकच्या आवरणाच्या विळख्यात अडकलेल्या अवस्थेत किंबहुना त्या अडकवलेल्या आहेत, या प्लास्टिकच्या आक्रमणाचा फटका आरोग्यदायी असलेल्या पत्रावळ्या बनवण्याचा व्यवसाय करणाऱ्या अलिबाग तालुक्यातील बहिरोळे, मापगाव येथील अनेक गरीब व्यावसायिकांना बसत आहे. यामुळे या व्यवसायाला शेवटची घरघर लागली आहे.
लग्नाचा हंगाम सुरू झाला आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात जेवणासाठी बहुतेक प्लास्टिकच्या पत्रावळ्यांचा वापर होतो आहे. मात्र या प्लॅस्टिकच्या पत्रावळ्यांमुळे जेवणामधून आपल्या पोटात एकप्रकारे विषच जात आहे. प्लॅस्टिकच्या पत्रावळ्यांमुळे कर्करोगासारखे अनेक गंभीर आजार होत आहेत. आज प्रत्येक कार्यात प्लॅस्टिकच्या पत्रावळ्यांचा वापर वाढल्यामुळे आरोग्य धोक्यात आले आहे, शिवाय त्यांचे योग्य त्या प्रकारे विघटन होत नसल्याने मोठ्या प्रमाणात प्रदूषणात वाढ होत आहे. यासाठी जनजागृती करत देशी पानांच्या पत्रावळ्या व मातीची भांडी वापरून आपले जीवन समृद्ध करण्यासाठी सर्वांनीच पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे.
आपल्या देशात दोन हजार पेक्षा जास्त वनस्पतींच्या पानांवर जेवण ग्रहण करण्यात येत होते, त्यामध्ये मुख्यतः केळीच्या पानावर जेवण केल्यावर ते आरोग्यासाठी खूपच हितकारक व लाभदायक मानले गेले आहे, याबाबत प्राचीन ग्रंथालयात देखील उल्लेख आढळतो. याची दखल घेऊन आज अनेक महागड्या व पंचतारांकित हॉटेलमध्ये जेवणासाठी नैसर्गिक वनस्पतींच्या पानांचा वापर करण्यात येत आहे. जेवणासाठी नैसर्गिक पानांचा उपयोग केल्यास आरोग्य तर चांगले राहीलच शिवाय प्लास्टिकमुळे मोठ्या प्रमाणात होणारे प्रदूषण रोखण्यासाठी मोठी मदत होणार आहे.
दरम्यान, अलिबाग तालुक्यातील बहिरोळे, मापगांव येथे घरोघरी फार पूर्वीपासून माऊली नावाच्या वेलीच्या पानापासून तेथील महिला व पुरुष ग्रामस्थ पत्रावळ्या बनवण्याचा व्यवसाय करीत आहेत. यासाठी तेथील महिला व पुरुष पहाटेच्यावेळी दव पडत असताना कनकेश्वर डोंगरावर जाऊन तेथे असलेल्या झाडांवर नैसर्गिकरित्या उगवलेल्या माऊली नावाच्या वेलीची पाने तोडून आणतात, यानंतर ती पाने व्यवस्थित जुळवून नारळाच्या झापांच्या काड्यांच्या साहाय्याने हव्या त्या आकारात विणतात. यानंतर मागणी असेल त्याप्रमाणे पत्रावळ्या मोजून त्यांचे गठ्ठे बनवतात. या पत्रावळ्या बनवण्यासाठी त्यांच्या कुटुंबातील सदस्य यांची मोठी साथ आवश्यक असते. काढून आणलेली वेलीची पाने ठराविक वेळेत उपयोगात आणली जाते, अन्यथा नुकसान होते. मागील काही वर्षांपासून प्लास्टिकच्या पत्रावळ्या बाजारात विक्रीसाठी आल्यामुळे पारंपरिक व आरोग्यासाठी लाभदायक असलेल्या पत्रावळ्यांची मागणी घटली आहे, यामुळे आज वर्षानुवर्षे नैसर्गिक पानांच्या पत्रावळ्यांचा व्यवसाय करून उपजीविका करणाऱ्यांची मात्र उपासमार होत असल्याचे येथील गरीब व्यवसायिकांनी सांगितले आहे.
याबाबत बहिरोळे येथील पत्रावळ्या बनवून त्या विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या महिला काजल थळे यांनी बोलताना सांगितले की, आम्ही हा व्यवसाय आमच्या आजी-आजोबांपासून करत आहोत, आज बाजारात स्वस्त दरात प्लास्टिकच्या पत्रावळ्या विक्रीसाठी आल्यामुळे व कनकेश्वर डोंगरावर मोठ्या प्रमाणात होत असलेल्या प्रदूषणामुळे तसेच तेथील वृक्ष तोडीमुळे आज माऊली या वेलीची पाने कमी प्रमाणात मिळत आहेत, त्यामुळे आमचा पारंपरिक व्यवसाय धोक्यात आला आहे, तरी शासनाने आमचा पारंपरिक व्यवसाय टिकण्याकरीता जनजागृती करत आम्हाला आमच्या व्यवसायाकरीता योग्य ते सहकार्य करावे, अशी त्यांनी शासनाकडे मागणी केली आहे.
यासोबतच बहिरोळे येथील पत्रावळ्यांचा व्यवसाय करणाऱ्या दर्शना थळे यांनी यादेखील आपल्या व्यथा व्यक्त करताना सांगितले की, कनकेश्वर डोंगरावरून पत्रावळ्यांची पाने आम्ही खूप मोठ्या कष्टाने व मेहनतीने आणून ती जुळवाजुळव करून आम्ही विकतो, मात्र प्लास्टिकच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या पत्रावळ्यांमुळे आमच्या नैसर्गिक पानांच्या पत्रावळ्यांची मागणी कमी झाली आहे व आम्हाला ग्राहक मिळेनाशे झाले आहेत. तरी शासनाने आपल्या शासनस्तरावर आमच्या पारंपारिक पत्रावळ्यांच्या व्यवसायाला गती द्यावी तसेच आरोग्यासाठी लाभदायक असणाऱ्या पत्रावळ्यांच्या विक्रीसाठी सोयीची बाजारपेठ उपलब्ध करून आम्हाला पुन्हा एकदा सुगीचे दिवस आणावे, अन्यथा आम्हाला या व्यवसायाच्या माध्यमातून मिळणारा रोजगार न मिळाल्यामुळे आमची उपासमार होत आहे, असे शेवटी सांगितले.
१. पळसाच्या पानात खाल्ल्याने सोन्याच्या ताटातील चांगुलपणा आणि आरोग्य मिळते.
२. केळीच्या पानांमध्ये खाल्ल्याने चांदीच्या ताटातील चांगुलपणा आणि आरोग्य मिळते.
३. पळसाच्या पानावर जेवल्यामुळे रक्ताच्या अशुध्दपणामुळे होणाऱ्या आजारांसाठी पळसाच्या पानापासून बनवलेले द्रोण उपयुक्त मानले जाते. तसेच पाचन तंत्राशी संबंधित आजारांसाठी व मुळव्याध रुग्णांसाठीही उपयुक्त मानली जाते.
४. सुपारीचे पान सांधेदुखीसाठी उपयुक्त मानली जाते, नव्या पानांपेक्षा जुनी पाने अधिक उपयोगी मानली जाते.
५. पक्षाघात झाल्याने अमलताच्या पाने उपयोगी समजल्या जातात.