सोलापूर : जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाचा पदभार घेतल्यानंतर माध्यमिक शिक्षणाधिकारी सुलभा वठारे यांनी शनिवारी सुट्टी दिवशीही कामकाज करीत प्रलंबित असलेल्या दोनशे दहा फायलींचा जागेवरच निपटारा केला आहे.
माध्यमिक शिक्षणाधिकारी भास्करराव बाबर आजारी असल्याने प्रदीर्घ रजेवर गेले आहेत. त्यामुळे माध्यमिक शिक्षण विभागाच्या प्रलंबित कामाबाबत ओरड सुरू झाली होती. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी तक्रारींची दखल घेत माध्यमिक शिक्षणाचा पदभार सुलभा वठारे यांच्याकडे सोपविला. अशातच शिक्षक आमदार आसगावकर व शिक्षण उपसंचालक औदुंबर उकिरडे यांचा दौरा झाला. या दौऱ्यात शिक्षक संघटनांनी माध्यमिक शिक्षण विभागात अनेक कामे प्रलंबित असल्याची तक्रार केली. त्यावर सीईओ स्वामी यांनी शनिवारी सुट्टी दिवशीही माध्यमिक शिक्षण विभागाचा कारभार सुरू ठेवून प्रलंबित कामे मार्गी लावण्याच्या सूचना केल्या. त्याप्रमाणे प्रभारी शिक्षणाधिकारी वठारे यांनी शनिवारी कार्यालयीन कामकाज सुरू ठेवले अधीक्षक, वरिष्ठ लिपिक संजय बानूर यांच्यासह कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.
पेन्शनच्या फायलीचा निपटारा
माध्यमिक शिक्षण विभागात पेन्शनरची अनेक प्रकरणे प्रलंबित असल्यामुळे ओरड सुरू होती. शिक्षणाधिकारी वठारे यांनी शनिवारी पेन्शनची ५५, भविष्य निर्वाह निधीची ८५ आणि वैद्यकीय बिलांची ७० प्रकरणे मार्गी लावली.