मुंबई – लोकसभा निवडणूक जवळ आल्यामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे. यामध्येच आता राष्ट्रवादी शरद पवार पक्षामध्ये असणारे एकनाथ खडसे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. एकनाथ खडसे पुन्हा स्वगृही अर्थात भारतीय जनता पक्षात जाणार असल्याच्या चर्चेला सध्या उधाण आलं आहे. त्यातच आता रोहिणी खडसेंच्या एका पोस्टमुळे ही सगळी चर्चा खडसे कुटुंब चर्चांच्या केंद्रस्थानी आले आहे.
2020 साली भाजप पक्षातील अंतर्गत होणाऱ्या चुकीच्या घडामोडी आणि चुकीच्या वागणुकीवर बोट ठेवून भाजपाला रामराम ठोकला होता. त्यानंतर त्यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तेव्हापासून एकनाथ खडसेंनी सातत्याने भारतीय जनता पक्ष व पक्षातील नेतेमंडंळींवर तोंडसुख घेण्याची एकही संधी सोडलेली नाही. मात्र, आता लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एकनाथ खडसेंच्या घरवापसीच्या चर्चांमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
मी राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची प्रदेशाध्यक्षा म्हणून काम करीत आहे, मी याच पक्षात आहे व भविष्यातही याच पक्षात राहणार आहे.
मी आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांसोबतच …
लढ़ेंगे और जीतेंगे ✊✊
@NCPspeaks pic.twitter.com/XqHrrnJFol— Adv Rohini Eknathrao Khadse (@Rohini_khadse) April 6, 2024
रोहिणी खडसेंची पोस्ट चर्चेत!
दरम्यान, एकीकडे एकनाथ खडसेंच्या घरवापसीची चर्चा चालू असताना दुसरीकडे त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी मात्र आपण शरद पवार यांच्यासोबतच राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. यासंदर्भात त्यांनी एक्सवर (ट्विटर) केलेली पोस्ट व्हायरल होत आहे. “मी राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करत आहे. मी याच पक्षात आहे आणि भविष्यातही याच पक्षात राहणार आहे. मी शरद पवारांसोबतच. लडेंगे और जीतेंगे”, असं रोहिणी खडसेंनी या पोस्टमध्ये नमूद केलं आहे. यासह त्यांनी हातात तुतारी घेतलेला एक फोटोही शेअर केला आहे.