मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) हे त्यांच्या समर्थक आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये (Shinde-Fadnavis Government) सहभागी झाले आहेत. त्यामुळे आता राज्यात दोन उपमुख्यमंत्री झाले आहेत. एक देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि दुसरे नव्याने शपथ घेतलेले अजित पवार (Ajit Pawar). पण या सर्व घडामोडींनंतर मुख्यमंत्री बदलणार का? याबाबतच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र, भाजपच्या सूत्रांनी (BJP) याची माहिती दिली आहे.
अजित पवार यांनी रविवारी राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एकप्रकारे भूकंपच झाला. त्यानंतर आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. त्यातच एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून कायम राहतील का याची चर्चा सुरु आहे. पण आता एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून कायम राहतील असे सध्यातरी दिसत आहे. कारण त्यांना पदच्युत केल्यास भाजपची विश्वासार्हता संपुष्टात येईल आणि त्यांच्यासोबत कोणीही जायला तयार होणार नाही, असे भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले.
मुख्यमंत्री शिंदेंना पूर्वकल्पना
भाजप नेत्याने सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार सरकारमध्ये सामील झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सरकारमध्ये सामील होत असल्याची पूर्ण जाणीव होती आणि मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीशिवाय खातेवाटप होऊ शकत नाही. अजित पवार यांच्यासोबत आलेले कोणीही राष्ट्रवादीत परत जाणार नाहीत, असा विश्वास भाजपच्या नेत्याने व्यक्त केला.