सोलापूर : जुनी पेन्शन योजनेसाठी (Old Pension Scheme) झेडपीच्या विविध कर्मचारी संघटनेनी एल्गार पुकारला आहे. गुरूवारी मुख्यालय परिसरात ‘एकच मिशन, जुनी पेन्शन’चा नारा देत कर्मचारी संघटनेची बेमुदत संपाची हाक दिली आहे.
१ नोव्हेंबर २००५ पासून शासकीय सेवेत आलेल्या सर्व कर्मचाऱ्यांची नवीन पेन्शन योजना रदद करुन जुनी पेन्शन योजना मिळविण्यासाठी मागील १४ ते २० मार्च पर्यंत सात दिवसांचा क्रांतिकारी संप केला होता. माजी सनदी अधिकारी यांच्या अध्यक्षेतखाली त्रीसदस्यीय जुनी पेन्शन योजनेच्या समितीची स्थापना १४ मार्च रोजी करण्यात आली होती. तरी जुनी पेन्शन लागू करण्यात आली नाही. महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाच्या वतीने संप उभारण्यात आला आहे.
निवेदनामध्ये एकूण १७ मागण्या होत्या. त्यामध्ये नवीन पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करावी, कंत्राटी पध्दत बंद करावे, कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करावे व समान काम समान वेतन लागू करावे, खासगीकरण थांबवावे, लिपीक, लेखा, आरोग्य कर्मचारी, वाहनचालक, ग्रामसेवक व चतुर्थ श्रेणी कर्मचारी व इतर कर्मचाऱ्यांचे वेतनश्रेणतील वेतनत्रुटी दूर करावे, मंजूर आकृतीबंधाप्रमाणे चार लाख रिक्त पदे कायमस्वरुपी भरावेत, चतुर्थ श्रेणी कर्मचारी, वाहन चालक पदांच्या भरतीवरील बंदी उठवावी, शिक्षणाचे खासगीकरण थांबवून समूह शाळा धोरण रद्द करावे, अनुकंपा तत्वावरील नियुक्ती करावी, थकीत महागाई भत्ता द्यावा, आठव्या वेतन आयोगाचे गठन करावे, कामगार विरोधी कायदे रद्द करावे, झेडपी कर्मचाऱ्यांचे वेतन एक तारखेला व्हावे, सरंक्षणासाठी ३५३ कलम प्रभावी करावे, आदिवासी नक्षलग्रस्त भागातील अधिकाऱ्यांना एकस्तर वरिष्ठ श्रेणी द्यावी, यासह विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले.
यावेळी विभागीय सह सचिव दिनेश बनसोडे, मराठा सेवा संघ जिल्हाध्यक्ष अविनाश गोडसे, कार्याध्यक्ष सचिन मायनाळ, कंत्राटी कर्मचारी संघाचे अध्यक्ष सचिन जाधव, अनिल बिराजदार, सी. टी. पवार, लक्ष्मण वंजारी, श्रीकांत मेहरकर, सुनंदा सुरवसे, चेतन भोसले, निर्मला पवार, सचिन चव्हाण, संदीप खरबस, कानिफनाथ चव्हाण, सचिन सोनकांबळे आदी कर्मचारी उपस्थित होते.
महाराष्ट्र जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचा संपात सहभाग घेणार नसल्याचा निर्णय राज्याच्या कार्यकारणीत घेण्यात आल्यामुळे संपात सहभागी नाही. मात्र जुनी पेन्शना योजनेच्या संपाला युनियनचा पाठींबा आहे. आशी माहीती राज्य सरचिटणीस विवेक लिंगराज यांनी दिली.
सर्व मागासवर्गीय बहुजन कर्मचारी पदाधिकारी व कार्यकारणी सदस्य यांना कळविण्यात आले आहे. संपामध्ये मागासवर्गीय बहुजन कर्मचारी संघटनेचा सहभाग नाही, मध्ये अनेक कारणे आहेत ते आपल्या समक्ष बैठक घेऊन बोलण्यात येणार आहे. संपाच्या दोन-तीन दिवसानंतर बैठक घेऊन संपात सहभागी होण्यासंदर्भात निर्णय घेणार आहोत, उद्या जर संप झाला तर आपण सारे काळ्याफिती लावून संपाला पाठिंबा देणार आहोत. तरी मागासवर्गीय बहुजन कर्मचारी, सर्वजण कोणीही प्रत्यक्षरित्या संपात सहभागी होणार नाही.
– गिरीश जाधव, अध्यक्ष, मागासवर्गीय बहुजन कर्मचारी संघटना, जि. प. सोलापूर.