मुंबई – मुंबई राज्य असल्यापासून महाराष्ट्र (Maharashtra) हे आर्थिकदृष्ट्या प्रगतिशील (Economically Progressive) राज्य आहे. गेल्या काही वर्षात संपूर्ण देशाला उद्योग क्षेत्रात प्रथम क्रमांकावर आणण्यासाठी कसोशीने प्रयत्न सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर उद्योजकांनी केवळ रोजगार निर्मितीसाठी (Employment Generation) करार करून संतुष्ट न राहता आश्वासित रोजगारापेक्षा मोठे उद्दिष्ट्य पुढे ठेवून राज्यात आणि जम्मू-काश्मीरसारख्या राज्यात देखील उद्योग सुरु करण्याचे ध्येय बाळगावे, असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी केले.
राज्यातील युवक-युवतींना रोजगार उपलब्ध व्हावा या दृष्टीने विविध क्षेत्रांमध्ये एकूण १.२१ लाख रोजगार निर्मितीसाठी नामांकित उद्योजक, औद्योगिक संघटना, प्लेसमेंट एजेंसीज आणि राज्याच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालय यांच्यात राजभवन मुंबई येथे सामंजस्य करार करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis), कौशल्य व रोजगार मंत्री मंगलप्रभात लोढा, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, कौशल्य विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा, आयुक्त डॉ. रामास्वामी एन. तसेच विविध उद्योग संस्था व प्लेसमेंट संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. राज्यात कौशल्य प्रशिक्षित मनुष्यबळ निर्मितीसाठी कौशल्य विद्यापीठाची निर्मिती करण्यात आली आहे. आयआयटी, आयटीआय सारख्या संस्था आहेत. अशावेळी राज्याच्या समतोल विकासासाठी ग्रामीण भागातील युवकांना देखील औद्योगिक प्रशिक्षण देऊन उद्योजक बनविले पाहिजे असे राज्यपालांनी यावेळी सांगितले.
गेल्या २ -३ महिन्यात राज्यातील काही उद्योग राज्याबाहेर गेले; परंतु उद्योग बाहेर जाण्याची प्रक्रिया अचानक होत नसते असे सांगून यानंतर राज्यातून कोणतेही उद्योग बाहेर जाणार नाही असा शासनाचा प्रयत्न राहील असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. राज्यात मोठे प्रकल्प येतील, या दृष्टीने पंतप्रधानांशी चर्चा झाली आहे व त्याचे फलित लवकरच पाहायला मिळेल असेही त्यांनी सांगितले. राज्य शासनाने अवघ्या काही महिन्यातच ७२ मोठे निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. राज्य शासनाने शासकीय नोकऱ्यांमध्ये ७५००० लोकांना नोकऱ्या देण्याचा तसेच खासगी क्षेत्रात देखील रोजगार उपलब्ध करून देण्याचे ठरवले आहे असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. आज झालेल्या रोजगार निर्मितीच्या प्रत्येक सामंजस्य कराराचा पाठपुरावा केला जाईल असे त्यांनी सांगितले.
हिंदू रोजगार डॉट कॉम, क्वेस कॉर्प. (स्टाफिंग सोल्युशन्स), युवाशक्ती स्किल इंडिया, परम स्किल्स ट्रेनिंग, विंडो टेक्नॉलॉजीज, अभिनव इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, सुमित फॅसिलिटीज, इनोव्हेशन कम्स जॉईन्टली, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, बीव्हीजी इंडिया, पुणे मॅनेजमेंट असोसिएशन आदी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.