संग्रहित फोटो
ओतूर/मनोहर हिंगणे : गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे बाजारभाव प्रचंड घसरल्याने जुन्नर तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. पिकाला लागलेला खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. चांगला बाजारभाव मिळेल, या आशेने चाळीत साठवणूक केलेल्या कांद्यास अपेक्षित बाजारभाव मिळत नसल्याने साठवणूक केलेला कांदा कवडीमोल भावाने विकला जात असून, यातून वाहतूक आणि इतर खर्चही भरून काढणे शेतकऱ्यांना शक्य होत नाहीये.
ओतूर, उदापूर, डिंगोरे, पिंपळगावजोगा, ठिकेकरवाडी, माळवाडी, नेतवड, रोहोकडी, आंबेगव्हान, पाचघर, चिल्हेवाडी, अहिनवेवाडी, डुंबरवाडी व परिसरातील इतर गावांमध्ये उन्हाळी कांद्याचे उच्च प्रतीचे उत्पादन घेतले जाते. जुन्नर तालुक्यातील यावर्षी एप्रिल ते मे महिन्यात काढणी केलेल्या चांगल्या कांद्याचे दर १५ ते १७ रुपये किलो होते. तोच कांदा सहा महिने चाळीत साठवणूक करून आता शेतकऱ्यांनी साठवणूक केलेला कांदा बाजारात विक्रीसाठी आणला असता त्यास ८ ते १० रुपये प्रति किलोला दर मिळत असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार आवार ओतूरचे व्यवस्थापक सतीश मस्करे व आडतदार शकील तांबोळी यांनी बोलताना दिली. त्यामुळे पडलेल्या बाजारभावामुळे कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.
गेल्या वर्षी चांगला भाव मिळाल्याने अनेक शेतकऱ्यांनी यंदा कांद्याची मोठ्या प्रमाणावर लागवड केली होती. मात्र, आता बाजारपेठेत आवक वाढल्यामुळे आणि मागणी घटल्यामुळे दर प्रचंड कोसळले आहेत. प्रति किलो ८ ते १० रुपये पर्यंतचा दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. काही ठिकाणी तर सहा ते आठ रुपये किलो दराने कांदा विकावा लागत आहे. या संकटामुळे शेतकऱ्यांनी सरकारकडे मदतीची मागणी केली आहे. सरकारने तातडीने हस्तक्षेप करून कांद्याला किमान आधारभूत किंमत (MSP) जाहीर करावी किंवा निर्यात शुल्क हटवून निर्यातीला प्रोत्साहन द्यावे, अशी मागणी ओतूर येथील प्रगतशील शेतकरी बबन शंकरराव डुंबरे व राजाराम गायकर यांनी केली आहे. अन्यथा, अनेक शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागेल आणि त्यांच्यावर कर्जाचा डोंगर वाढेल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.
सरकारने यावर त्वरित उपाययोजना न केल्यास शेतकऱ्यांचे आंदोलन उभे राहू शकते, असा इशाराही काही शेतकरी नेत्यांनी दिला आहे. कांद्याचे आगार समजले जाणारे जुन्नर तालुका प्रसिद्ध असून ह्या भागातील कांद्याला वाशी, पुणे, बेंगलोर, नाशिक आदी भागात विषेश मागणी असते. कांदा हे जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांचे एक महत्त्वाचे नगदी पीक असल्याने या समस्येवर तातडीने तोडगा काढणे आवश्यक असल्याचे मत डिंगोरे येथील प्रगतशील शेतकरी जालिंदर उकिरडे व दत्तात्रय डुंबरे यांनी व्यक्त केले आहे.