आटपाडी / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : आवळाई (ता. आटपाडी) येथे सकाळी अकरा वाजता मोदी सरकारचा रथ आला होता व योजनांच्या माहितीचा प्रचार जनता चालू होता. त्यावेळी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व आटपाडी खानापूर विधानसभेचे अध्यक्ष गणेश जुगदर यांनी हा कार्यक्रम रद्द करण्यास लावला होता.
या कार्यक्रमाला पहिली ते दहावीपर्यंत शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिंनींना सक्ती करून कार्यक्रमासाठी बसवले होते. यावेळी शिक्षक, शिपाई उपस्थित होते. तर या कार्यक्रमासाठी शेतकरी कोणीही नव्हते व गावातील ग्रामस्थ नव्हते तरी अशा पद्धतीने पंचायत समितीचे अधिकारी व महसूल खात्याचे अधिकारी या ठिकाणी कार्यक्रमास उपस्थित होते. तसेच गावचे सरपंच उपस्थित होते.
हा कार्यक्रम चालू असताना शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व कार्यकर्त्यांनी कार्यक्रम बंद करायला लावला. मोदी सरकारऐवजी भारत सरकार करा, अशी मागणी केली. कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पंचायत समितीचे अधिकारी यांनी पोलिसांना फोन करून पोलीस बोलावून घेतले व पोलिसांच्या मदतीने हा वाद मिटवण्यात आला.
पुढील कार्यक्रम घेण्यावेळेस आपल्या मागण्यानुसार मोदी सरकार ऐवजी आम्ही भारत सरकार करू, असे तोंडी आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. त्यानंतर पोलीस संरक्षणात कार्यक्रम पुढे चालू ठेवला. कार्यक्रम संपन्न करून निघून गेले. या कार्यक्रमाला कोणी शेतकरी उपस्थित राहिले नाहीत. शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनी व्यतिरिक्त कोणतेही ग्रामस्थ उपस्थित नव्हते.